लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाचा अर्थसंकल्प पुढील सभागृहात सादर केला जाणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी यासाठी तयारी केली आहे. जीएसटी अनुदानात वाढ झाल्याने थोडा दिलासा मिळाला. परंतु मुख्य आर्थिक स्त्रोतातून पहिल्या सहामाहीत अपेक्षित महसूल जमा झालेला नाही. यामुळे आर्थिक चिंता कायम आहे. त्यामुळे यंदाचाही मनपाचा अर्थसंकल्प प्रामुख्याने शासन अनुदानावरच निर्भर राहण्याचे संकेत आहेत.
पहिल्या सहामाहित ८७६ कोटी मनपा तिजोरीत जमा झाले आहे. यात शासन अनुदान स्वरुपात ७२० कोटी मिळाले. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रस्तावित अर्थसंकल्पात २ हजार ५२३.८२ कोटींचे महसुली लक्ष्य ठेवले होते. यातील ८७६ कोटी जमा झाले.
माजी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी २०१९-२० या वर्षाचा ३ हजार १९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र, मनपा तिजोरीत २ हजार २५७.४५ कोटींचा महसूल जमा झाला. याचा विचार करता पिंटू झलके यांनी वास्तव अर्थसंकल्प मांडला तर वाढीव अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा खंडित होण्याची शक्यता आहे.
मनपाकडील थकीत देणी व आवश्यक खर्च विचारात घेता विकास कामांसाठी निधी शिल्लक राहात नसल्याने झलके यांनी राज्य शासनाकडे ५०० कोटींच्या विशेष अनुदानाची मागणी केली आहे. परंतु ती पूर्ण होईलच याची शाश्वती नसल्याने आर्थिक अडचणी कायम आहे. गेल्या वर्षाचा विचार करता पहिल्या सहामाहीत १ हजार ५२५ कोटी जमा झाले होते. परंतु यावर्षी कोरोना संकटाचा फटका बसला. शासकीय अनुदानात घट होण्यासोबतच मनपा उत्पन्नातही घटले.
अर्थसंकल्पानंतर कामांना गती
मनपाचा २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर प्रभागातील आवश्यक कामे व रखडलेल्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध होण्याची नगरसेवकांना आशा आहे. अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्याचे संकेत स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिले आहे. याचा विचार करता दिवाळीनंतर कामांना गती मिळण्याची आशा आहे.