लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार हे कोविड व्हॅक्सिन घेतल्यानंतर जवळपास दहा दिवसांनी पॉझिटिव्ह आले. आश्चर्यकारक बाब म्हणजे ते तिसऱ्यांदा पॉझिटिव्ह आले आहेत. पहिल्यांदा सप्टेंबर महिन्यात त्यांना कोविडचे लक्षणे दिसून आली होती. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळी त्यांना कुठलीही लक्षण दिसून आलेली नाहीत. एसिम्टोमेटिक असल्यामुळे ते सध्या घरीच गृहविलगीकरणात आहेत.
मनपा आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉ. बहिरवार यांच्या कुठलीही लक्षणे दिसून आली नाहीत. परंतु विभागातर्फे नियमित टेस्ट करण्यात आली. यानंतर त्यांचा रिपोर्ट दोन दिवसांपूर्वीच पॉझिटिव्ह आला. ते सध्या घरीच आहेत. त्यांची प्रकृती बरी आहे. संसर्गाच्या पहिल्या लाटेत मनपा आरोग्य विभागाचे माजी आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांच्यासह अनेक डॉक्टर पॉझिटिव्ह आले होते. अत्यावश्यक सेवेत सामील असल्यामुळे मनपाचे डॉक्टर नियमितपणे संसर्गित रुग्णांच्या संपर्कात येतात. त्यामुळे फ्रंटलाईन वर्करचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. परंतु लस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह आल्याने मनपा आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.