विकास कामांना फटका : अत्यावश्यक कामासाठी निधी नाही : उद्दिष्ट कमी देऊनही पूर्तता नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेची यंत्रणा वर्षभरापासून कोविड-१९ च्या कामात व्यस्त आहे. याचा उत्पन्नाला फटका बसला आहे. त्यातच शासनाकडून विशेष अनुदान कमी झाले. मनपाचे मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर, पाणी कर, नगर रचना विभाग, बाजार व स्थावर विभागाकडून अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत ३१ मार्चपर्यंत अपेक्षित महसूल मनपा तिजोरीत जमा झालेला नाही. याचा परिणाम शहरातील विकास कामांवर झाला आहे. नागरी सुविधांची कामे ठप्प आहेत.
कोरोना संकटाचा विचार करता स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विजय झलके यांनी ४७६.८७ कोटीचा कट असलेला महापालिकेचा सन २०२०-२१ या वर्षाचा २,७३१ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. तर आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी २०२०-२१ या वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पात पुन्हा ३६४ कोटींचा कट लावून २,४३३.३३ कोटींचा अर्थसंकल्प दिला होता. प्रत्यक्षात मनपा तिजोरीत मार्चअखेरीस २,१०० कोटींचा महसूल जमा झाल्याचा अंदाज आहे. अद्याप अंतिम आकडेवारी वित्त विभागाकडे उपलब्ध नाही.
विशेष म्हणजे, कोविड संक्रमण विचारात घेता विभागांना वसुलीचे कमी उद्दिष्ट दिले होते. मनपाचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता करापासून ३३२.४८ कोटी, पाणी करातून १७५ कोटी, नगर रचना विभाग ११०.५० कोटी, बाजार विभाग १४.७५ कोटी तर स्थावर विभागाकडून १२.०५ कोटींचे उत्पन्न गृहित धरले होते. मात्र ३१ मार्चपर्यंत मालमत्ता करातून २४१ कोटी, नगर रचना विभाग ८२ कोटी, पाणी करातून १५६ कोटी, बाजार विभाग ८.३० कोटी तर, स्थावर विभागाकडून ४.४८ कोटीचा महसूल जमा झाला. यात ३९.३४ कोटींची तूट आहे. इतर विभागाचीही अशीच स्थिती आहे. त्यात शासनकडूनही अपेक्षित अनुदान मिळालेले नाही. याचा शहरातील विकास कामांवर परिणाम होणार आहे.
.....
विकास कामे ठप्पच
शहरातील विकास कामांसोबतच केंद्र व राज्य सरकारच्या प्रकल्पांना गती देण्याचा संकल्प अर्थसंकल्प सादर करताना करण्यात आला होता. यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली होती. प्रत्यक्षात शहरातील अमृत योजना, नाग नदी संवर्धन, सिमेंट रोड, पथदिवे यासह आवश्यक कामे जवळपास ठप्पच आहेत. नवीन कामे तर झालेली नाहीतच, प्रलंबित कामेसुद्धा पूर्ण झालेली नाही. यंत्रणा कोविड नियंत्रणात व्यस्त असल्याने शहरातील विकास कामांकडे दुर्लक्ष आहे.
....
३१ मार्चपर्यंत अपेक्षित व जमा महसूल (कोटी)
मालमत्ता कर ३३२.४८ २४१
पाणी कर १७५ १५६
नगर रचना विभाग ११०.५० ८२
बाजार १४.७५ ८.३०
स्थावर विभाग १२.०५ ४.४८