अर्थसंकल्पातही पडला विसर : कशा मिळणार नागरिकांना आरोग्य सुविधा ?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उपराजधानीतील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली होती. भटकंती करूनही रुग्णांना बेड मिळत नव्हते. ऑक्सिजनअभावी अनेकांचा मृत्यू झाला. संकटकाळात शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु पदाधिकारी व प्रशासन यासंदर्भात अजूनही गंभीर दिसत नाही. मौजा गाडगा, धरमपेठ येथील डिग दवाखान्याच्या जवळील नागरी सुविधा व व्यापारी संकुलासाठी आरक्षित असलेल्या ०.६५ हेक्टर जागेवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव तीन वर्षापासून धूळ खात पडून आहे.
डिक दवाखान्याच्या जवळील जागेवर बीओटी तत्त्वावर ३७३ बेडचे स्टेट ऑफ टेरिटरी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या प्रस्तावाला मनपा सभागृहात मंजुरी देण्यात आली होती. या प्रस्तावाला राज्य सरकारने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी मंजुरी दिली. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध असतील. परंतु मागील तीन वर्षात या प्रस्तावाला मनपाने अंतिम मंजुरी दिलेली नाही. विशेष म्हणजे, कोरोना संकटात मनपाची आरोग्य यंत्रणा कोलमडली असतानाही अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद तर दूरच या प्रस्तावाचा साधा उल्लेखही नाही.
डिक दवाखाना धरमपेठ येथे लसीकरण केंद्राचा नुकताच महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. परंतु प्रस्तावित हॉस्पिटलचा त्यांनाही विसर पडला आहे.
........
उपचार व शस्त्रक्रिया कधी होणार?
कोविड संक्रमणाचा विचार मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलेशन, आयुष, पाचपावली व के.टी.नगर आदी ठिकाणी ऑक्सिजनसह ३४० बेडची व्यवस्था करण्यात आली. परंतु या रुग्णालयात कायमस्वरूपी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करणे, विविध आजाराच्या रुग्णांना दाखल करून उपचारासह शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पदाधिकारी व प्रशासन गंभीर दिसत नाही.
....
अर्थसंकल्पात दुरुस्तीसाठी फक्त दोन कोटी
महापालिका रुग्णालयाच्या इमारती जुन्या आहेत. पाचपावली, आयसोलेशन, रुग्णालयाच्या इमारती दुरुस्तीला आल्या आहेत. परंतु मनपा अर्थसंकल्पात यासाठी जेमतेम दोन कोटीची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य केंद्र व रुग्णालयाचा विचार करता यातून डागडुजी करणे शक्य नाही.