लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका 'लसीकरण आपल्या परिसरात' ही अभिनव मोहीम सोमवार, २४ मेपासून राबविणार आहे. या मोहिमेत ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला व दुसरा डोस दिला जाईल.
स्लम, जुन्या वस्त्या व दाट वस्तीत लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी अशा वस्त्यांत प्रामुख्याने ही मोहीम राबविली जाणार आहे.
सोमवारपासून प्रत्येक झोनच्या लसीकरण केंद्राच्या परिसरात नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल. आठवड्यातील प्रत्येक दिवशी झोनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लसीकरण करण्यात येईल. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. ही मोहीम पूर्णतः नागरिकांसाठी असून नागरिक या अभिनव मोहिमेचा लाभ घेतील व आपले आणि आपल्या कुटुंबीयांचे लसीकरण करून घेतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
संकल्पना अडचणीत
शहरातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी महापालिका प्रशासन विविध संकल्पना राबवत आहेत; परंतु मागणीनुसार लस पुरवठा होत नसल्याने संकल्पना राबविताना अडचणी येत आहेत. यामुळेच १८ वर्षांवरील लसीकरण थांबविण्यात आले आहे.
४५ वर्षांवरील नागरिकांचे आज लसीकरण
शासनाचे निर्देशानुसार ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना रविवारी २३ मे रोजी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाईल. ज्या नागरिकांनी पहिला डोस १२ आठवड्यांपूर्वी घेतला त्यांना दुसरा डोस दिला जाईल. मनपाच्या सर्व केंद्रांवर लसीकरण केल्या जाईल. आरोग्य सेवक, फ्रंट लाइन वर्कर यांना सुद्धा दुसरा डोस दिला जाणार आहे. तसेच ड्राइव इन व्हॅक्सिनेशन केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होईल.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व मनपाचा महाल येथील स्व. प्रभाकर दटके रोग निदान केंद्र येथे कोव्हॅक्सिनचा फक्त दूसरा डोस उपलब्ध आहे, अशी माहिती राम जोशी यांनी दिली.