लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रभाग क्रमांक १७ मधील भाजपाचे नगरसेवक विजय चुटेले यांनी जनसंपर्क कार्यालय चालविण्यासाठी दरमहा १५ हजार अथवा कार्यालयासाठी एक सफाई कर्मचारी उपलब्ध करण्यास सांगितले होते. त्यांची ही मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी विरोधात खोटी तक्रार केल्याचा आरोप आरोग्य विभागातील मालवाहक जमादार संजय लुडेरकर यांनी केला आहे. यासंदर्भात महापौर, सत्तापक्षनेते व आयुक्त यांना निवेदन दिले असून चुटेले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लुडेरकर यांनी केली आहे.धंतोली झोनचे सहायक अभियंता श्याम धरममाळी आणि सफाई कर्मचारी संजय लुडेरकर यांनी आपल्या नावावर एका कार शोरूमच्या संचालकाकडे दोन लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार नगरसेवक विजय चुटेले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. याची दखल घेत श्याम धरममाळी यांची सोमवारी तडकाफडकी आसीनगरला बदली करण्यात आली आहे़ परंतु कर्मचाºयाने चुटेले यांच्यावरही पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप केल्याने या प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे.प्रभागात चुटेले यांची तीन जनसंपर्क कार्यालये आहेत. कार्यालयाचा महिन्याचा खर्च १५ हजारांच्या आसपास आहे. कार्यालयाचा खर्च म्हणून महिन्याला १५ हजार रुपयांची मागणी चुटेले यांनी केली होती. त्यांची ही मागणी पूर्ण न केल्याने माझ्यावर चुकीचे आरोप करून माझ्या विरोधात महापालिका प्रशासनाकडे खोटी केली. या प्रकरणाची चौकशी करून चुटेले यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लुडेरकर यांनी केली आहे.भाजपा नगरसेविकेच्या पतीकडून सफाई कर्मचाऱ्यांना पैशाची मागणी केल्याचे प्रकरण गाजत असतानाच चुटेले यांच्याविरोधात जमादाराने तक्रार केल्याने महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. महापालिकेतील भाजपाचे पदाधिकारी यासंदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.