नागपूर : क्षुल्लक कारणामुळे दुखावलेल्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. प्राजक बंडू तळवेकर (वय २०) असे त्याचे नाव आहे. प्राजक शिवसेनेचे नगरसेवक बंडू तळवेकर यांचा मुलगा होय. तो बारावीत शिकत होता. त्याला महागडी स्पोर्ट बाईक घेऊन पाहिजे होती. ‘दोन लाखांची असो की त्यापेक्षा महाग, आपण ही बाईक लगेच घेणार आहोत’, असे त्याने आपल्या मित्र-मैत्रिणींनाही सांगितले होते. बरेच दिवस झाले तरी त्याच्याकडे ती बाईक दिसत नसल्यामुळे त्याचे मित्र त्याला काहीसे उपहासात्मकपणे कधी येणार बाईक, अशी विचारणा करीत होते. परिणामी प्राजकने बाईकसाठी वडिलांच्या मागे तगादा लावला होता. ‘आठ दिवस थांब, नवीन वर्षात आपण ही बाईक घेऊ’, असे वडिलांनी म्हटले होते. नवीन वर्षात नवीन काही घेतल्याचा आपण आनंद घेऊ असे कुटुंबीय प्राजक्तला सांगत होते. मात्र, बाईकसाठी अधिर झालेला प्राजक काही ऐकण्याच्या तयारीत नव्हता. आज सकाळीसुद्धा प्राजक्तची त्याच्या कुटुंबीयांनी अशीच प्रेमळपणे समजूत काढली होती. प्राजक मात्र संतप्त झाला. रागाच्या भरात तो गरिबनवाज नगरातील घरून कपिलनगरातील (नारी) घरी आला आणि त्याने रागाच्या भरात गळफास लावून घेतला. बराच वेळ झाला तरी प्राजक परतला नाही. मोबाईलवरही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून त्याची शोधाशोध सुरू झाली. नारी येथील तळवेकरांच्या निवासस्थानी शोध घेतला असता तेथे प्राजक्त गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. (प्रतिनिधी)शिवसैनिकात अस्वस्थताप्राजक्तच्या आत्महत्येचे वृत्त कळताच शहर आणि जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात तळवेकर यांच्या निवासस्थानी पोहचले. क्षुल्लक कारणामुळे प्राजकने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली. सायंकाळी प्राजक्तवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेनेसोबतच सर्वच पक्षातील आणि सर्व स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक तळवेकर यांच्या मुलाची आत्महत्या
By admin | Published: December 22, 2015 4:30 AM