लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नगरसेवक निवडून येईपर्यंत तिकिटासाठी खूप चकरा मारतात. निवडून आल्यावर घरी झोपून राहतात. नागरिक घरी भेटायला येतात तेव्हा बाहेरूनच बायको सांगते नगरसेवक घरी नाहीत, असे करू नका. लोकांच्या घरी जा. जनसंपर्क वाढवा. भेटीगाठी घ्या. व्यक्तिगत संबंध जुळवा. सहानुभूती निर्माण करा. तेव्हाच पुढे तुमचा टिकाव लागेल, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवकांचे कान टोचले.गडकरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या आढाव्यासाठी भाजपा पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे नगरसेवकांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून नगरसेवक प्रभागात फिरत नाहीत, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नाही, अशा तक्रारी गडकरींपर्यंत जात आहेत. आमदारांनीही तशी नाराजी बोलून दाखविली आहे. याची दखल घेत त्यांनी नगरसेवकांना चिमटे घेतले, हे विशेष. गडकरी म्हणाले, परिश्रम कराल तर पुढे जाल. लोकांना जोडा. जे लोक नाराज आहेत त्यांना आधी भेटा. त्यांचे मन वळवा. नागरिक व कार्यकर्त्यांशी नम्रतेने वागा. लोकांना घेऊन चला. त्यांची कामे करून द्या. काम घेऊन येणाऱ्यांना हाकलू नका. आपली प्रतिमा सुधारा. दुकान चालवायचे असेल तर दुकानात बसून राहा. शटर बंद करून ठेवाल व कितीही चांगला माल असेल तर कोण येणार, असेही गडकरी म्हणाले. भाजपाच्या एका कार्यकर्त्याला तीन निवडणुकीत ६५० ते ६५४ एवढीच मते मिळायची. मी महामंत्री झालो तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्याला तिकीट दिले. तो निवडून आला. आज त्या बूथवर काँग्रेसला कार्यकर्ता मिळत नाही, अशी कामाची शैली असली पाहिजे, असेही गडकरी यांनी सांगितले.माधुरी दीक्षित नाही...महापौर आहेतगडकरी यांनी बैठकीत फटकेबाजी करीत सर्वांना लोटपोट केले. गडकरी म्हणाले, शहरातील विविध चौकात छोट्या एलईडी स्क्रीन लागल्या आहेत. एक दिवशी मी व पत्नी कांचनसह गाडीने जात असताना स्क्रीनवर पाहिले व या माधुरी दीक्षित आहेत का, असे विचारले. यावर कांचन हसून म्हणाली, अहो या माधुरी दीक्षित नाहीत, तुमच्या महापौर आहेत. हे ऐकून आम्ही सारेच हसलो, असे सांगताच सभागृहात हास्यकल्लोळ उडााला. उपस्थित महापौरही लाजल्या. या फटकेबाजीनंतर संबंधित स्क्रीनवर माणसं ओळखू आली पाहिजेत, असे सांगत तिचा आकार वाढविण्याची सूचना गडकरींनी केली.
नगरसेवकांनो, घरी येणाऱ्यांना हाकलू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 9:57 AM
लोकांच्या घरी जा. जनसंपर्क वाढवा. भेटीगाठी घ्या. व्यक्तिगत संबंध जुळवा. सहानुभूती निर्माण करा. तेव्हाच पुढे तुमचा टिकाव लागेल, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवकांचे कान टोचले.
ठळक मुद्देगडकरींनी टोचले नगरसेवकांचे कान नम्रतेने वागा, कामे करा