नागपूर : महापालिका निवडणुकीत प्रभाग रचना बदलली आहे. तीन सदस्यीय प्रभागानुसार अगामी निवडणुका होत आहेत. काही जुन्या प्रभागाचे तीन प्रभागात विभाजन झाले आहे. यामुळे विद्यमान वजनदार नगरसेवकांनी आपल्या सोयीच्या प्रभागातून लढण्याची तयारी सुरू केली आहे. याला विरोध होत असल्याने सत्तापक्षातील नगरसेवक आपसात भिडल्याचे चित्र आहे.
मनपातील काही पदाधिकाऱ्यांच्या जुन्या प्रभागाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. यामुळे त्यांना बाजूच्या प्रभागात लढण्याशिवाय पर्याय नाही. परंतु ५० टक्के महिला आरक्षणामुळे २६ प्रभागात पुरुषांसाठी एकच जागा मिळणार आहे. त्यात प्रस्थापित आपला प्रभाग सोडण्याला तयार नसल्याने नगरसेवकांत वाद निर्माण झाला आहे. यावरून तिकीट वाटप करताना नेत्यांची चांगलीच कसोटी लागणार आहे.
न फिरकलेल्यांना नागरिकांचाही विरोध
चार नगरसेवकांनी प्रभागाची चार भागात वाटणी केली होती. परंतु काही नगरसेवक मागील पाच वर्षात प्रभागात फिरकले नाही. नवीन प्रभाग रचनेचे प्रारूप जाहीर होताच नगरसेवकांनी बाजूच्या प्रभागातून तयारी सुरू केली आहे. मात्र आजवर प्रभागाकडे पाठ फिरवणाऱ्यांचे दर्शन होत आहे. यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. नागरिक जाब विचारत असल्याने नगरसेवकांची कोंडी झाली आहे.
१० मार्चनंतर चित्र स्पष्ट होणार
प्रभाग रचनेवर आक्षेप व सूचना १४ फेब्रुवारीपर्यंत स्वीकारल्या जातील. यावर निवडणूूक आयोगातर्फे नियुक्त अधिकारी सुनावणी करतील. ही प्रक्रिया २ मार्चपर्यंत होईल. त्यानंतर १० मार्चच्या सुमारास आरक्षण सोडत काढल्या जातील. त्यानंतरच प्रभागाचे चित्र स्पष्ट होईल. अशी माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
जातीय समीकरणे बदलणार
अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या असलेल्या अनेक वस्त्या नव्याने तयार झालेल्या प्रभागांना जोडण्यात आल्या आहेत. अशा प्रभागातील जातीय समीकरणे बदलणार आहेत. उमेदवार देताना राजकीय पक्षांना जातीय समीकरणांचा विचार करावा लागेल. उत्तर व मध्य नागपुरात अनेक वस्त्यांची विभागणी करून त्या इतर प्रभागांना जोडण्यात आल्या. दक्षिण नागपुरातही काही प्रभागात असेच चित्र आहे.