ऑनलाईन लोकमतनागपूर : वर्तमानपत्रांमधून सर्व दु:ख, आजार व कष्ट समाप्त करण्याचा दावा करणाऱ्या ब्रह्मर्षी कुमार स्वामींना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आम्ही देत असलेल्या असाध्य रोगींचे आजार सिद्ध मंत्राने संपूर्णपणे दुरुस्त करून दाखवा आणि २५ लाख रुपये मिळवा, असे जाहीर आव्हान दिले. तसेच मानकापूर पोलिसात तक्रार देत कार्यवाहीची मागणी केली.तक्रारीत म्हटल्याप्रमाणे नागपूर येथे आयोजित १७-१८ रोजी दोन दिवसीय ब्रह्मर्षी कुमार स्वामींचा प्रभू कृपा अदभूत दु:ख निवारण महासमागम या नावाने कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती वर्तमानपत्रातील जाहिरातीत प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत सत्यामित्रानंद गिरीजी महाराज यांच्या नावाचा संदर्भ देत ‘ब्रह्मर्षी श्री कुमार स्वामीजींमध्ये साक्षात भगवान गणपतीच्या शक्तीचा वास आहे म्हणूनच त्यांच्या स्पर्शाने सर्व रोग नष्ट होतात’ असा चमत्कारिक दावा करण्यात आला आहे. वरील दावे व वृत्तपत्रातील जाहिरात ही ड्रग्ज अॅण्ड मॅजिक रेमेडीज अॅक्ट १९५४ या कायद्याचा तसेच मेडिकल प्रॅक्टीशनर अॅक्ट १९६१ महाराष्ट्र या कायद्याचा भंग करणारी असून, जनसामान्यांची दिशाभूल करीत त्यांना लुबाडणारी आहे. सदर स्वामीविरुद्ध इतर राज्यांत जनतेला ठगविण्याची उदाहरणे यू ट्यूबवर उपलब्ध आहेत. याबाबतीत चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.तक्रार देण्यासाठी अ.भा.अंनिसचे राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख, पंकज वंजारे महाराष्ट्र राज्य संघटक अ.भा.अंनिस युवा शाखा, महिला शाखा राज्य संघटक छाया सावरकर, उत्तम सुळके, नागपूर युवा शाखा कार्याध्यक्ष निखिल मोटघरे, वर्धा युवा जिल्हा शाखा सहसंघटक सुमित उगेमुगे, समुद्रपूर युवा शाखा संघटक संजित ढोके यांच्यासह नागपूर युवा शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आम्ही रुग्णही पुरवितो; तुम्ही बरे करून दाखवाअ.भा. अंनिसने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, प्रकाशित जाहिरातीत विविध मान्यवरांचे नाव, छायाचित्रासह आणखी काही दावे करीत आपल्या व्यक्तिगत, कौटुंबिक ग्रहदोषाची बाधा, समस्येच्या समाधानाकरिता समागमस्थळी संपर्क करण्याची माहिती याच जाहिरातीमध्ये आहे. मंत्राने रोग व कष्ट समाप्त करण्याच्या दाव्यावर अ.भा. अंनिसने ब्रह्मर्षी कुमार स्वामींना आम्ही रोगी देतो, त्यांचे असाध्य आजार तुम्ही तुमच्यातील सिद्ध मंत्रांनी, स्पर्शांनी पूर्णपणे दुरुस्त करून द्या आणि २५ लाख रुपये मिळवा, असे जाहीर आव्हान दिले आहे.