लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अदखलपात्र प्रकरणात कारवाईची धमकी देऊन १५ हजाराची लाच मागणाऱ्या एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. गणेश रामजी चव्हाण (वय ५१) असे त्याचे नाव आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असताना गुरुवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.एसीबीचा हा सापळा ज्यांच्या तक्रारीवरून लागला, ते तक्रारदार भीमनगर, इसासनी येथील रहिवासी आहे. त्यांच्या साडभावाच्या मुलाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका मुलीने तक्रारअर्ज दिला होता. त्याची चौकशी करण्यासाठी तक्रारदाराच्या साडभावाला आणि त्यांच्या मुलाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते. ठाणेदार रायन्नावार यांनी मुलाची चौकशी केली. तुला तक्रारकर्त्या मुलीसोबत लग्न करायचे आहे का, अशीही विचारणा केली. त्याने नकार दिला. त्यानंतर रायन्नावार यांनी त्याचे बयाण नोंदवून त्याला समज देऊन सोडून दिले. पुन्हा एक महिन्यानंतर हा तक्रारअर्ज चौकशीसाठी हवालदार कैलास रामप्रसाद पवार यांच्याकडे सोपविण्यात आला. पवार यांनी तक्रारदारास फोन करून या तक्रारअर्जाची माहिती दिली. मुलाविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकते, अशी धमकी दिली अन् कोणतीही कारवाई करायची नसेल तर १५ हजार रुपये लाच द्यावी लागेल, असे म्हटले. लाचेची ही रक्कम वसूल करण्यासाठी हवालदार पवारने त्याचा साथीदार गणेश चव्हाण याला कामी लावले. चव्हाण याने १५ हजाराच्या लाचेसाठी तक्रारदारामागे तगादा लावला. त्याला कंटाळून तक्रारदाराने पवार आणि चव्हाणची तक्रार एसीबीकडे नोंदविली. एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर आणि अप्पर अधीक्षक राजेश दुद्धलवार यांनी शहानिशा करवून घेतल्यानंतर हवालदार पवार आणि चव्हाणला रंगेहात पकडण्यासाठी सापळा लावला. ठरल्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सारंग मिराशी, प्रमोद चौधरी, हवालदार दिनेश शिवले, नायक मंगेश कळंबे, सारंग बालपांडे आणि शारिक अहमद यांचे पथक गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास पोहचले. त्यांनी सांगितल्यानुसार, तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन एमआयडीसी ठाण्यात गेले. हवालदार चव्हाणने त्याला समोरच्या चहाटपरीवर थांबायला सांगितले. काही वेळेतच चव्हाण तेथे पोहचला अन् त्याने लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्या.
नागपुरात लाचखोर पोलीस हवालदार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:20 AM
अदखलपात्र प्रकरणात कारवाईची धमकी देऊन १५ हजाराची लाच मागणाऱ्या एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली.
ठळक मुद्देसाथीदार सटकला : एमआयडीसी ठाण्याच्या परिसरात घटना