नागपूर : विरोधी पक्षांतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करायची. नंतर त्यांना ईडी, सीबीआयचा वापर करून गुन्हे दाखल करायचे. नंतर तेच सोबत आले की मंत्री करायचे. ‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा’ असे भाजपचे काम सुरू आहे. आता या पक्षाचे नाव भ्रष्ट जनता पार्टी असे करा, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या पक्षफोडीवर संघ व भाजपातील निष्ठावान कार्यकर्ते नाराज असून डोक्यावर उपऱ्यांचे डोंगर चढविण्यासाठी ते झटले का, असा सवालही त्यांनी केला.
वसंतराव देशपांडे सभागृहात सोमवारी आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. विनायकराव राऊत, खा. अरविंद सावंत, मिलिंद नारवेकर, आ. नितीन देशमुख, माजी खा. प्रकाश जाधव, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरिया, जिल्हाप्रमुख राजू हरणे, देवेंद्र गोडबोले, शहरप्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे, सतीश हरडे आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, कालपर्यंत पंतप्रधान मोदींवर टीका करणारे आता त्यांना विकास पुरुष म्हणत आहेत. त्यांना सत्तेतून स्वत:चा विकास करायचा आहे, अशी टीका त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली. शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या घरी धाडी टाकून धमकावले जात आहे. तुरुंगात टाकले जात आहे. हे आता चालणार नाही. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. तुम्ही मनमानी कराल तर छत्रपतींच्या संस्काराची तलवार तुमच्यावर चालवावी लागेल, असा इशारा देत मर्दाची औलाद असाल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा व मैदानात या, असे आव्हान त्यांनी भाजप नेत्यांना दिले. पंतप्रधान मोदी मध्य प्रदेशात प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी जातात. मग, मणिपूरला का जात नाहीत. तेथे डबल इंजिन सरकार असून मणिपूर का धुमसत आहे, असा सवालही त्यांनी केला.
आता ‘होऊन जाऊ द्या चर्चा’
- कोरोना काळात पीएम केअर फंडाच्या नावावर पैसा गोळा करण्यात आला. हा जनतेचा पैसा होता. त्याचे काय झाले, त्याचा मालक कोण, हा पैसा कुठे व कसा वापरला याचा जनतेला हिशेब द्या. चीन, रशिया, दक्षिण कोरियाप्रमाणे आपला देश अध्यक्षीय हुकूमशाहीच्या दिशेने जात आहे. त्यामुळे या विरोधात आता उघडपणे बोला. २०१४ मध्ये ‘चाय पे चर्चा’ झाली होती. आता ‘होऊन जाऊ द्या चर्चा’ हा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी राबवा व गेल्या १० वर्षांत कुणाला काय मिळाले यावर उघड चर्चा घडवून आणा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
फडणवीसांची क्लिप वाजवली, ‘कलंक’ असल्याची टीका
- एकवेळ सत्तेशिवाय राहू पण राष्ट्रवादीसोबत बसणार नाही..नाही..नाही...असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य असलेली क्लिप उद्धव ठाकरे यांनी मोबाइलमधून ऐकवली. यांचे नाही म्हणजे हो समजायचे. सहन होत नाही व सांगताही येत नाही, अशी फडणवीस यांची स्थिती झाली आहे, असे काय हे नागपूरवर कलंक आहे, अशी बोचरी टीकाही ठाकरे यांनी केली.
बावनकुळे, तुमचे तिकीट का कापले?
बावनकुळे तुमचं तिकीट का कापलं होतं? तुमची पुरती अब्रू जातेय आणि तुम्ही लुडबूड करत आहात. खिळा लागला तरी चालेल पण खुर्ची आहे ना, असेच तुमचे सुरू आहे, असे चिमटे ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना काढले.