नागपूर : कामठी कॅंटोनमेंट बोर्डात नोकरीच्या नावावर उमेदवारांकडून पैसे उकळत भ्रष्टाचार करण्याचे रॅकट समोर आले आहे. सीबीआयने या प्रकरणात छापे टाकत तीन आरोपींना अटक केली आहे. यात लाच देणाऱ्या एका उमेदवारासह कॅंटोनमेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षाचादेखील समावेश आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून बोर्डातील अधिकाऱ्यांवरदेखील संशयाची सुई आहे. सफाई कर्मचारी दीप रमेश सकतेल, नर्सरी शिक्षिका शीतल रामटेके व पदभरतीसाठी लाच देणारा चंद्रशेखर चिधलोरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांसह रॅकेटमध्ये सहभागी असलेला माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर उर्फ चंदू लांजेवारवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संरक्षण मंत्रालयातर्फे कामठी कॅंटोनमेन्ट बोर्डात प्रायमरी शिक्षक, माळी व सफाई कर्मचारी पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबविण्याची जाहिरात जारी करण्यात आली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात अर्ज आले. या भरतीत नियुक्तीपत्र मिळविण्यासाठी हे रॅकेट सुरू झाले. यात बोर्डातील अधिकाऱ्यांसह खाजगी व्यक्तींचा समावेश होता. सीबीआयला मिळालेल्या माहितीनुसार लांजेवार हा आरोपी दीपच्या माध्यमातून नोकरीसाठी इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांना संपर्क करत होता. त्यांच्या जाळ्यात चिधलोरे हा फसला. कॅंटोनमेन्टच्या परीक्षेच्या निकालात माळी पदासाठी त्याचे नाव यादीत आले होते. मात्र कन्फर्म नियुक्तीपत्र मिळविण्यासाठी त्याने साडेअकरा लाख रुपये देण्याचे कबुल केले. १८ ते २३ जानेवारीदरम्यान त्याने दीपला ५० हजार रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले. यादरम्यान लांजेवारने कुणाकडून किती पैसे आले व कोणत्या अधिकाऱ्याला किती रक्कम दिली याचा हिशेब ठेवण्याची जबाबदारी शिक्षिका असलेल्या शीतल रामटेकेकडे दिली.
१७ एप्रिल रोजी चिधलोरेची फिजिकल टेस्ट होती. मात्र ती पोस्टपोन झाली. चिधलोरेने साडेअकरा लाख रुपये देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले व दोन लाख रुपये देण्याची तयारी दाखविली. दीप व लांजेवारने याला मान्यता दिली. हा व्यवहार १८ एप्रिल रोजी होणार होता. सीबीआयच्या पथकाला याची माहिती मिळाली. सीबीआयच्या पथकाने सापळा रचून दीपला २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्या चौकशीवरून शीतल रामटेकेचादेखील रॅकेटमध्ये समावेश असल्याची बाब समोर आली. सीबीआयने तिलादेखील अटक केली. दीप, चिधलोरे व रामटेकेच्या घराची झडती घेण्यात आली. सीबीआयचे उपअधीक्षक नीरज कुमार गुप्ता हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.