लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील कारेगाव (ता. लोणार) येथे जल पुरवठा योजनेमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव, बुलडाणा जिल्हाधिकारी व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.मोहन हाडे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. कारेगावात पाणीटंचाई आहे. त्यामुळे सरकारने जल पुरवठा योजनेसाठी २००८ मध्ये १४ लाख, २०१३ मध्ये ३१ लाख तर २०१६ मध्ये ३४ लाख रुपये मंजूर केले. योजनेंतर्गत सहा किलोमीटरवरील कोनाटी धरणाजवळ विहीर खोदून गावापर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु, भ्रष्टाचारामुळे पाण्याचा प्रश्न आजही सुटलेला नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. विजय वानखेडे व अॅड. अमोल चाकोतकर यांनी कामकाज पाहिले.