मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारात घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या किमतीत वाढ झाल्याचा फटका १ आॅगस्टला देशांतर्गत दिसून आला. विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत नागपुरात ३३ रुपये ८२ पैशांची वाढ होऊन किंमत ८४२ रुपयांवर पोहोचली. बँक खात्यात अनुदान किती जमा होते, ही बाब सोडल्यास प्रारंभी सिलिंडर खरेदी करताना ग्राहकांना ८४२ रुपये मोजावे लागणार आहे. गत चार महिन्यात सिलिंडरच्या किमतीत १४२ रुपयांनी वाढ झाली आहे. दर महिन्याच्या वाढीव किमतीचा आलेख पाहिल्यास काही महिन्यातच सिलिंडर एक हजारावर जाईल, हे विशेष.सरकारी तेल कंपन्यांकडून दर महिन्याच्या १ तारखेला घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीचा आढावा घेतला जातो व त्यानुसार त्याची किंमत कमी-जास्त होते. घरगुती वापराचे म्हणजे १४.२ किलो वजनाचे १२ सिलिंडर वर्षभरात अनुदानित किमतीत ग्राहकांना सरकारकडून मिळतात. अनुदानाची ही रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते.
ग्राहकांना अनुदानआंतरराष्ट्रीय स्तरावर घरगुती सिलिंडरसाठी आवश्यक असणाऱ्या गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. भारतातील गॅस सिलिंडरच्या किमती त्यानुसार ठरतात. चालू आर्थिक वर्षाचा आढावा घेतला असता, नागपुरात एप्रिल-२०१८ मध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ७०० रुपये होती. त्यावर १९९.७७ रुपये ग्राहकाला अनुदान मिळत होते. मे महिन्यात ६९९ रुपये किंमत आणि १९८.८२ रुपये अनुदान, जून महिन्यात ७४८ रुपये आणि २४५.४२ रुपये अनुदान, जुलैमध्ये ८०६.५० रुपये किंमत आणि ३०१ रुपये अनुदान तर आॅगस्टमध्ये विनाअनुदान सिलिंडरची किंमत ८४२ रुपये आणि त्यावर ३३४.८२ रुपये अनुदान ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
उज्ज्वला गॅस योजनेत गरिबांना सिलिंडर खरेदीची वानवागृहिणींना धुरापासून सुटका मिळावी म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना गरिबांसाठी लागू केली. सरकारने गृहिणीच्या नावाने गॅस सिलिंडर कनेक्शन आणि शेगडी दिली. पण आता सिलिंडरची किंमत वाढल्यामुळे गरिबांना वाढीव दरात सिलिंडरची खरेदी आवाक्याबाहेर झाली आहे. अनेक राज्यांमध्ये गॅसचा उपयोग कमी होऊन पुन्हा लाकडांवर स्वयंपाक करणे सुरू झाले आहे. सिलिंडरची दर महिन्याला वाढणारी किंमत गरिबांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. विनाअनुदानित सिलिंडरची किंमत वाढवा, पण गरिबांसाठी एक धोरण तयार करा. त्यामुळेच सरकारच्या उज्ज्वला योजनेला यश मिळू शकेल, असे मत एका एजन्सी मालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले.