राजीव सिंह ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या लोकांवर सुरुवातीला प्रति व्यक्ती ६०० रुपये खर्च येत होता. तो आता कमी झाला असून प्रति व्यक्ती ५२ रुपये खर्च येत आहे. हे ऐकून थोडे आश्चर्य वाटेल, परंतु हे सत्य आहे. शहरातील आठ क्वारंटाईन सेंटरमध्ये सध्या १९०० नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांना दोन वेळ जेवण, नाश्ता, चहा दिला जातो.क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना मोफत जेवण व नाश्ता देण्याचा राधास्वामी सत्संग मंडळाने स्वत: दिलेला प्रस्ताव मनपाने स्वीकारला. मनपाने आता फक्त नाश्ता व जेवण पोहचवण्यासाठी एजन्सीची नेमणूक केली आहे. एजन्सी दर दिवशी प्रत्येकी ५२ रुपये शुल्क घेत आहे. येरला येथील मंडळाच्या स्वयंपाकघरातून शहरातील ८ क्वारंटाईन सेंटरवर वेळेवर जेवण व नाश्ता पोहोचवण्याची जबाबदारी एजन्सीवर आहे.
जेवण व नाश्त्यात हे मिळतेक्वारंटाईन सेंटरमध्ये सकाळी ८ ते ९ दरम्यान पोहे, आलूबोंडा वा उपमा दिला जातो. दुपारी १२ ते २ दरम्यान जेवण दिले जाते. जेवणात तीन पोळ्या, भाजी, भात व वरण दिले जाते. एखाद्याला जादाचे जेवण हवे असल्यास पुरविले जाते. सायंकाळी चहा, बिस्किटे दिली जातात. रात्री ८ ते ९ दरम्यान जेवण दिले जाते.