सज्जन पाटील
लाेकमत न्यूज नेटवर्क
मांढळ : मांढळ (ता. कुही) येथील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी जलस्वराज्य याेजना व राष्ट्रीय पेयजल याेजनेच्या माध्यमातून तब्बल तीन काेटी रुपयांचा खर्च केला. या निधीतून विहीर खाेदण्यापासून तर पाईपलाईन टाकण्यापर्यंतची कामे करण्यात आली. मात्र, ही याेजना यशस्वी झाली नाही. त्यामुळे या याेजनेवर करण्यात आलेला तीन काेटी रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून, एकीकडे सदाेष कामामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे मांढळवासीयांची पिण्याच्या पाण्याची समस्याही सुटली नाही.
मांढळ हे कुही तालुक्यातील माेठ्या व महत्त्वाच्या गावांपैकी एक गाव असून, ही तालुक्यातील प्रमुख व जुनी बाजारपेठ आहे. येथील पिण्याच्या पाण्याची समस्या साेडविण्यासाठी जलस्वराज्य याेजनेंतर्गत ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून पाणीपुरवठ्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. ती टाकताना पाईपचा दर्जा व पाण्याचा दाब याकडे लक्ष देण्यात न आल्याने पाईपलाईन फुटण्याचे व त्यातून पाणी वाया जाण्याचे प्रमाण वाढले.
पुढे याच समस्येसाठी राष्ट्रीय पेयजल याेजनेंतर्गत १ काेटी ९७ लाख रुपये मंजूर करण्यात आले. या निधीतून आम नदीच्या तीरावरील बाेरी घाटात विहीर खाेदण्यात आली. त्या विहिरीपासून तीन किमीवर असलेल्या मांढळपर्यंत नव्याने पाईपलाईन टाकण्यात आली. ही याेजना २०२० मध्ये पूर्णत्वास गेली. सध्या या याेजनेतून केवळ दाेन तास पाणी मिळत असून, या दाेन तासांत पाण्याची टाकीदेखील पूर्णपणे भरत नाही. शेतात पाईप फुटल्याने दाेन महिन्यांपासून या विहिरीतील पाणी मिळणेदेखील बंद आहे.
फुटलेली पाईपलाईन कंत्राटदाराकडून दुरुस्ती करून घेतली जाईल. त्यानंतर पाणीपुरवठा सुरू हाेईल, अशी माहिती उपसरपंच सुखदेव जीभकाटे यांनी दिली. सध्या आंभाेरा मार्गावरील विहिरीतून पाणीपुरवठा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे, ही समस्या कायमची साेडविण्यासाठी आंभाेरा येथून पाणी आणावे आणि जलशुद्धिकरण केंद्र तयार करून त्यातील पाणी वापरावे, अशी प्रतिक्रिया माजी सरपंच लीलाधर धनविजय यांनी व्यक्त केली. यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ३.२५ काेटी रुपये मंजूर केले हाेते. १० टक्के रक्कम ग्रामपंचायतीला भरावयाची हाेती. परंतु, ग्रामसभेत हा १० टक्के रकमेचा ठराव मंजूर न झाल्याने ही याेजना बारगळली.
...
याेजनेचा ताबा घेण्यास नकार
राष्ट्रीय पेयजल याेजनेंतर्गत करण्यात आलेली बहुतांश कामेही सदाेष असल्याने गावाला नियमित पाणीपुरवठा हाेणे शक्य नाही. ही बाब स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या याेजनेचा ताबा घेण्यास नकार दिल्याने या याेजनेचे हस्तांतरण रखडले आहे. ही याेजना ग्रामपंचायतीला पूर्णपणे हस्तांतरित करण्यात न आल्याने कंत्राटदाराचे १० टक्के देयके रखडले आहे.
...
लाेकवर्गणीतून नळजाेडणी
गावाला अंतर्गत पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन ही ४० वर्षांपूर्वी टाकण्यात आली असून, ती जमिनीत काही भागात साडेचार ते पाच फूट खाेल, तर काही भागात दाेन ते तीन फूट खाेल टाकण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचा दाब नियंत्रित हाेत नसल्याने पाण्याचे व्यवस्थित वितरण हाेत नाही. शिवाय, पाईपलाईन फुटण्याचे प्रमाणही वाढले आहे. पाणी वितरणासाठी गावात पाण्याच्या चार टाक्या बांधण्यात आल्या असून, त्यांची एकूण साठवण क्षमता पाच लाख लिटर आहे. गावात १,८०० नळ कनेक्शन असून, यातील ९०० कनेक्शन अनधिकृत आहेत. ते अधिकृत करण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये लाेकवर्गणी घेण्यात आली.
...