नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांचे कृषी उत्पादन रेल्वेच्या मदतीने देशविदेशात पाठविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अंतर्गत पूर्व विदर्भातील संत्री बांगलादेशात पाठविली आहेत. आता २२ डिसेंबरपासून विदर्भातील कापूस, सोयाबीन केक, कापड, ट्रॅक्टरची निर्यात थेट बांगलादेशला करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
ही उत्पादने रेल्वेने विदर्भातून हल्दियापर्यंत जाणार आहे. तेथून रिव्हरपोर्टहून आगरतळा मार्गाने बांगलादेशला जाईल. यामुळे वाहतुकीचा खर्च कमी येईल आणि विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले भाव मिळतील. त्यांना प्रति क्विंटल ८ ते १० हजार रुपये भाव मिळू शकेल. आकोट येथून केळींची निर्यात करण्यासाठी रेल्वे चालविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.
वर्धेजवळील सिंदी येथे साकार होणाऱ्या ड्रायपोर्टहून स्थानिकांना उत्पादनांची थेट निर्यात करता येईल. हा ड्रायपोर्ट तीन ते चार महिन्यात तयार होईल. असाच एक ड्रायपोर्ट जालना येथे तयार होत आहे. यावेळी गडकरी यांनी झिंगा, माशांची निर्यात सिंगापूर, दुबई येथे करण्यावर भर देताना शेतकऱ्यांना ड्रोनच्या मदतीने शेतात कीटकनाशक व नॅनो युरियाची फवारणी करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होईल आणि उत्पादनही चांगले मिळेल.
सहा महिन्यात येणार फ्लेक्स इंजिन
गडकरी म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर पर्याय म्हणून फ्लेक्स इंजिन तयार करण्यात येत आहे. हे इंजिन बायोफ्यूएलवर चालू शकेल. टोयोटा, मारुती सुझुकी ह्युंडईने फ्लेक्स इंजिन बनविणे सुरू केले आहे. हे इंजिन सहा महिन्यात येईल. बजाज आणि टीव्हीएस फ्लेक्स इंजिनवर आधारित मोटरसायकल बनवीत आहे.