लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यांचे व्यवस्थापन होणे महत्त्वाचे आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव पुढील हंगामात टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड न घेता पऱ्हाट्या रोटाव्हेटर किंवा श्रेडर यासारख्या यंत्राद्वारे जमिनीत गाडाव्यात. त्यामुळे शेंदरी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होईल, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक यांच्या वतीने करण्यात आले आहे.कापूस हे राज्यातील प्रमुख नगदी पीक आहे. राज्यात सरासरी ४१.२९ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली जाते. खरीप २०१७ मध्ये ४२.०७ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड झाली असून त्यामध्ये बीटी वाणांचा समावेश करण्यात आला आहे. २०१७ च्या खरीप हंगामात महाराष्ट्रातील सर्वच कापूस उत्पादक जिल्हयांमध्ये शेंदरी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या किडीचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. अन्यथा आगामी काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल.शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणाच्या दृष्टीने एकात्मिक कीड व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करणे आवश्यक असून कापूस उत्पादनाशी निगडीत सर्व यंत्रणा जसे शेतकरी, कृषी विभाग, कापूस पीक संशोधन संस्था, बियाणे उत्पादन कंपन्या, कीटकनाशक कंपन्या, कापूस खरेदी केंद्रे गोडाऊन, जिनिंग प्रेसिंग मिल्स इत्यादी संस्थांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.