जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे धरणे : वासनिकांचा तीव्र आंदोलनाचा इशारानागपूर : कापसाला ८००० रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी जिल्हा ग्रामीण काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस व माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या नेतृत्त्वात अजनी चौकात काँग्रेसजनांनी धरणे दिले. आंदोलनात शेतकऱ्यांनी आणलेला कापूस घेऊन वासनिक कार्यकर्त्यांसह शेजारच्या पणन महासंघाच्या कार्यालयाच्या पायऱ्यांवर पोहचले व अधिकाऱ्यांना कापूस फुकट भेट देऊन सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पायऱ्यांवर कापसाची फेकाफेक करीत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात लाखो शेतकरी सहभागी झाले होते. मात्र, त्यानंतरही शेतमालाच्या हमी भावात वाढ करण्यात आली नाही. याच्या निषेधार्थ वासनिक यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरले. अजनी चौकात आयोजित धरणे आंदोलनात बोलताना वासनिक यांनी युती सरकारवर नेम साधला. कापसाला ८००० रुपये भाव देण्याची मागणी करीत ज्या शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे त्यांना फरकाची रक्कम बोनस म्हणून द्यावी व ती थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेली आश्वासने पाळली नाही. शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप करीत पाकिस्तानबाबत मोदींच्या धरसोड धोरणाची देशाला जबर किंमत मोजावी लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या वेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे, माजी आमदार देवराव रडके, एस.क्यु. जमा, बाबूराव तिडके, बाबुराव झाडे, मुकुंदराव पन्नासे, रामराव वानखेडे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली. भाजप नेत्यांनी खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करीत मते घेतली. आता आगामी निवडणुकांमध्ये फसवणुकीचा वचपा घेण्याचे आवाहन या नेत्यांनी केले. शेवटी वासनिक यांच्या नेतृत्वात पणन महासंघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कार्यकर्ते कापूस घेऊन पणन महासंघाच्या कार्यालयाच्या पायऱ्यांवर पोहचले. अधिकाऱ्यांना खाली पायऱ्यांवर बोलविण्यात आले. कवडीमोल भावाने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करीत आहात, त्यापेक्षा फुकटच घ्या, असे म्हणत कापसाचे गाठोडे अधिकाऱ्यांना सोपविण्यात आले. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेले मागण्यांचे निवेदनही सोपविण्यात आले. आंदोलनात काँग्रेस नेते नाना गावंडे, सुरेश भोयर, सुरेश कुमरे, कुंदा राऊत, चंद्रपाल चौकसे, हूकूमचंद आमधरे, शकूर नागानी, मुजीब पठाण, शांता कुंभरे, बंटी शेळके, अशोकसिंग चौहान, आभा भोगे, किशोर मिरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. संचालन प्रकाश वसू यांनी केले.(प्रतिनिधी)तर आमदारांच्या घरासमोरही आंदोलनशेतकऱ्यांच्या सन्मानासाठी काँग्रेसने लढा उभारला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. यापुढे तालुका पातळीवर, शासकीय कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल. एवढेच नव्हे तर फसवी आश्वासने देणाऱ्या भाजप- सेनेच्या खासदार, आमदारांच्या घरासमोरही आंदोलन केले जाईल. प्रसंगी रस्ता रोकोही केला जाईल. - मुकुल वासनिक, माजी केंद्रीय मंत्रीटाळ, वीणा अन् मृदंगाचा गजरकाँग्रेसच्या आंदोलनात शेतकरी टाळ, वीणा, मृदंग घेऊन सहभागी झाले होते. पंढरीच्या विठ्ठलाला साद घालणारी भजने म्हणत शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या कार्यालयाकडे कूच केले. या भजनाच्या माध्यमातून दिली जात असलेली हाक पांडुरंगाने ऐकावी व सरकारला शेतकऱ्यांची मदत करण्याची सदबुद्धी द्यावी, अशी भावना या वेळी या शेतकऱ्यांनी बोलून दाखविली.
पणन महासंघाला दिला कापूस फुकट
By admin | Published: January 09, 2016 3:27 AM