लोकमत न्यूज नेटवर्क
कुही : तालुक्यात कपाशीचे लागवड क्षेत्र हळूहळू वाढत आहे. सध्या शेतकऱ्यांच्या घरात कापूस साठवून आहे. बाजारात कापसाचे दर कमी असल्याने शेतकऱ्यांना कमी दरात कापूस विकणे परवडण्याजाेगे नाही. दुसरीकडे, शासनाने तालुक्यात पणन महासंघ अथवा सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र मागणी करूनही सुरू न केल्याने कापूस उत्पादकांची चिंता वाढली आहे.
कुही तालुक्यात चालू खरीप हंगामात १६,४८७.४० हेक्टरमध्ये कपाशीची लागवड करण्यात आली असून, एकूण चार खासगी जीन आहेत. मागील हंगामात शासनाने पणन महासंघाच्या माध्यामातून आधारभूत किमतीने कापूस खरेदी केली हाेती. त्यामुळे यावर्षी शासन कापूस खरेदी केंद्र सुरू करेल, अशी शेतकऱ्यांना आशा हाेती. परंतु, सीसीआय व कापूस पणन महासंघाने खरेदी केंद्र सुरू न केल्याने शेतकऱ्यांच्या ताेंडचे पाणी पळाले आहे.
यावर्षी कपाशीवर माेठ्या प्रमाणात गुलाबी बाेंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाची प्रत खालावली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढल्याचे, तसेच एकरी सात ते आठ क्विंटल कापसाचे उत्पादन हाेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शासनाने कापसाची आधारभूत किंमत प्रति क्विंटल ५,५१५ रुपये (मध्यम धागा) व ५,८२५ रुपये (लांब धागा) जाहीर केली आहे. वास्तवात, व्यापारी ५,४०० ते ५,६०० रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ११५ ते २२५ रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीतूनही कापसाचा उत्पादन खर्च भरून निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांचे हाेणारे आर्थिक नुकसान व गैरसाेय टाळण्यासाठी शासनाने तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी मांढळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरीश कढव यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
....
मागील वर्षी चिपडी (ता. कुही) येथील खासगी जिनिंगमध्ये पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र सुरू केले हाेते. यावर्षी कापूस पणन महासंघाच्या महासंचालकांच्या आदेशानुसार कुही तालुक्यात कापूस विक्रीसाठी नाेंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. यात तालुक्यातील १,६०१ शेतकऱ्यांनी नाेंदणी केली आहे. कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याचा प्रस्ताव बाजार समितीने कापूस पणन महासंघाकडे पाठविला आहे. खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू आहे.
- अंकुश झंझाळ, सचिव,
कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ, ता. कुही.