लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जवळपास ५० दिवसानंतर सुरू झालेले कॉटन मार्केट गेल्या आठवड्यात केवळ एकच दिवस सुरू राहिले. आक्षेपानंतर अडतियांनी व्यवसाय करण्यास नकार दिल्याने बंद करण्यात आले. मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर पुन्हा शनिवारपासून मार्केट सुरू होणार आहे. मार्केट गुरुवारपासून सुरू होणार होते, पण बुघवारी आग लागल्याने शनिवारपासून सुरू करण्याचा निर्णय अडतियांनी घेतला आहे.बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी झाल्यानंतर निर्जंतुकीकरणासाठी मनपा आयुक्तांनी २८ मार्चपासून कॉटन मार्केट बंद करून शेतकऱ्यांसाठी शहरातील दहा जागेत बाजाराची निर्मिती करून भाज्यांची विक्री सुरू केली होती. पण या बाजारांनाही ग्राहकांचा फारसा प्रतिसाद न मिळाल्याने धंतोली यशवंत स्टेडियम येथील बाजार वगळता सर्वच बाजार बंद झाले. काही सुरूच झाले नाहीत. अडतियांच्या मागणीनंतर गेल्या आठवड्यात मार्केट सुरू झाले, पण मनपा कर्मचाऱ्यांचा अडतियांसोबत झालेला वाद आणि दरदिवशी केवळ ४० अडतियांना व्यवसायाची परवानगी दिल्यानंतर एकाच दिवसात मार्केट बंद करण्याचा निर्णय अडतियांनी घेतला. मार्केटमध्ये ८० अडतिये कार्यरत असताना मनपा अधिकाऱ्यांनी २४० जणांची यादी तयार करून प्रत्येक अडतियाला आठवड्यानंतर व्यवसायाची परवानगी दिली होती. यावरही अडतियांनी आक्षेप घेतला होता.महात्मा फुले अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, मार्केटमध्ये व्यवसायाची परवानगी बुधवारी मिळाली. गुरुवारपासून व्यवसाय करणे शक्य नाही. भाजी उत्पादक शेतकऱ्यांना बाजारात भाज्या विक्रीसाठी आणण्यासाठी कळविण्यात येत आहे. आठवड्यात शुक्रवारी बाजार बंद असतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भाज्यांची विक्री शनिवारपासून सुरू होणार आहे. एकाच छताखाली भाज्यांची विक्री होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल आणि ग्राहकांनाही किफायत भावात भाज्या मिळतील, शिवाय अडतिये आणि व्यापाऱ्यांनाही उत्पन्न मिळेल. त्यामुळे आर्थिक साखळी पूर्ण होणार आहे. मार्केटमध्ये आगीच्या घटना वाढत आहे. बुधवारी २५ व्यापाऱ्यांची दुकाने जळाली असून त्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे अडतिया आणि व्यापाऱ्यांना पक्की दुकाने बांधून द्यावीत, अशी मागणी महाजन यांनी केली.
कॉटन मार्केट शनिवारपासून पुन्हा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 9:50 PM