सुनील चरपे
नागपूर : देशभरात एकूण २९८.३५ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज ‘सीएआय’ने तर ‘सीओसीपीसी’ने ३४३.४७ लाख गाठींचे उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. या दाेन्ही संस्थांच्या अंदाजात ४५.१२ लाख गाठींची तफावत आहे. त्यामुळे बाजारात सायकाॅलाॅजिकल प्रेशर तयार झाल्याने देशातील वस्त्राेद्याेगासह कापूस उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण झाला व दरवाढीला ब्रेक लागला आहे.
देशातील वस्त्राेद्याेग व शेतकरी यूएसडीए, सीएआय व सीओसीपीसी या संस्थांच्या कापूस उत्पादन अंदाजावर लक्ष ठेवून असतात. चालू हंगामात देशात ३१२ ते ३१५ लाख गाठी कापसाचा वापर व मागणी आहे. प्रतिकूल हवामान, राेग व किडींचा प्रादुर्भाव आणि सततच्या अतिमुसळधार पावसामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी कापूस राेखून धरल्याने बाजारातील आवकही संथ हाेती.
सीओसीपीसीने एप्रिलमध्ये कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त करताच मेमध्ये आवक वाढली व दर घसरले. १ ऑक्टाे. २०२२ ते ३१ मे २०२३ या काळात २५५.५३२ लाख गाठी कापूस बाजारात आला. म्हणजे सीओसीपीसीच्या मते किमान ८७.९७ लाख गाठी, तर सीएआयच्या मते ४२.८२ लाख गाठी कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. सीओसीपीसीच्या अंदाजामुळे बाजारात सायकाॅलाॅजिकल प्रेशर तयार हाेऊन दर दबावात आल्याचे बाजार तज्ज्ञांनी सांगितले.
कापूस उत्पादनाचा अंदाज
यूएसडीए, सीएआय व सीओसीपीसी या प्रमुख संस्था कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त करतात व त्यांच्या अंदाजामुळे बाजार व दर प्रभावित हाेतात. ऑक्टाेबर २०२२ ते मे २०२३ या काळात यूएसडीने त्यांचा कापूस उत्पादन अंदाज ३६२ लाख गाठींवरून ३१३ लाख गाठी, सीएआयने ३७५ लाख गाठींवरून २९८.३५ लाख गाठींवर, तर सीओसीपीसीने ३६५ लाख गाठींवरून ३४३.४७ लाख गाठींवर आणला आहे.
सीओसीपीसीच्या अंदाजात घाेळ
सीओसीपीसीने ऑक्टाेबर २०२२ मध्ये ३६५ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. २४ मार्च व २० एप्रिल २०२३ राेजी याच संस्थेने अनुक्रमे ३३७.२३ लाख गाठींचा अंदाज व्यक्त केला हाेता. १ जून २०२३ राेजी या संस्थेने त्यांच्या अंदाजात घट करण्याऐवजी वाढ करून ३४३.४७ गाठींचा अंदाज व्यक्त केला. या संस्थेने महिनाभरात ६.२४ लाख गाठींचे उत्पादन कसे व का वाढणार, हे स्पष्ट केले नाही.
सीएआयचा अंदाज खरा मानला तर दरवाढ हाेणे अपेक्षित हाेते. पण, सीओसीपीसीच्या अंदाजामुळे आवक वाढली व दरवाढीला ब्रेक लावण्यास मदत करणारा ठरला. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.
- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक, कापूस पणन महासंघ, महाराष्ट्र राज्य