सुनील चरपे
नागपूर : ३० एप्रिलपर्यंत २४६.१५६ लाख गाठी कापूस देशातील बाजारात आला असून, मागच्या हंगामाच्या (सन २०२०-२१) तुलनेत चालू हंगामात (सन २०२१-२२) ९०.२० लाख गाठी कमी कापसाची आवक झाली आहे. ८ ते १० टक्के हंगाम शिल्लक असल्याने यावर्षी २७० ते २७५ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, देशात दरवर्षी कापसाचा वापर व मागणी किमान २५ लाख गाठींनी वाढत आहे.
भारतात १ ऑक्टाेबर ते ३० सप्टेंबर हा काळ कापूस वर्ष मानले जाते. सन २०२१-२२ च्या हंगामात ऑगस्ट २०२१ मध्येच कापसाच्या खरेदीला सुरुवात झाली हाेती. या हंगामात भारतात ३६०.१३ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज सीएआय (काॅटन असाेसिएशन ऑफ इंडिया)ने तर, ३४५ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज यूएसडीए (युनायटेड स्टेटस् डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर)ने तसेच सीएबी (काॅटन ॲडव्हायझरी बाेर्ड)ने ३७० लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. हे अंदाज ऑक्टाेबर २०२१ मध्ये व्यक्त करण्यात आले हाेते.
पुढे बाजारातील कापसाची आवक लक्षात घेता जानेवारी २०२२ मध्ये या तिन्ही संस्थांनी त्यांचे कापूस उत्पादनाचे अंदाज अनुक्रमे ३४० लाख, ३१५ लाख व ३५० लाख गाठींवर आले हाेते. या हंगामात २९० लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज देशभरातील जिनर्स असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला तर तज्ज्ञ व कापूस बाजार अभ्यासकांच्या मते हे उत्पादन ३१० लाख गाठींचे असेल. देशभरातील कापड व सूत गिरणी मालक याच अंदाजावर विश्वास ठेवत नियाेजन करतात. मागील काही वर्षांपासून कापूस उत्पादनाचा अंदाज आणि बाजारातील आवक यात माेठी तफावत येत असल्याने त्यांची फसगतही हाेत आहे.
‘क्लाेजिंग स्टाॅक’चा घाेळ
सीएबीने सन २०२०-२१ च्या हंगामातील कापसाचा ओपनिंग स्टाॅक १२०.७९ लाख गाठींचा दाखवून उत्पादन ३५२.४८ लाख गाठींचे दाखवित क्लाेजिंग स्टाॅक ७१.८४ लाख गाठींचा दाखविला हाेता. त्यामुळे सन २०२१-२२ च्या हंगामात ओपनिंग स्टाॅक ७१.८४ लाख गाठींचा दाखवून उत्पादन मात्र ३४० लाख गाठींचे, आयात १८ लाख गाठींची व निर्यात ४० लाख गाठींची दाखवित क्लाेजिंग स्टाॅक हा ४५.४६ लाख गाठींचा दाखविला आहे. वास्तवात, २०२०-२१ च्या हंगामातील क्लाेजिंग व २०२१-२२ च्या हंगामातील ओपनिंग स्टाॅक हा केवळ १६ ते १७ लाख गाठींचा हाेता. सन २०२१-२२ च्या हंगामातील कापसाची निर्यात ही ४० लाख गाठींची दाखविली असली तरी ती ५० लाख गाठींपेक्षा अधिक असून, हंगामाच्या शेवटी ही निर्यात ६५ लाख गाठींवर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.