लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना काही सूचनाही विभागाने दिल्या आहेत. जिल्ह्यात १ जूनपासून कापसाच्या बियाण्यांची विक्री होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी उत्पादने खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगसह शासकीय मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.सोयाबीनच्या बाबतीत शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण तपासणी करावी. किमान ६५ टक्के उगवण क्षमता असलेले बियाणे जतन करून पेरणीकरिता वापरावे, असा सल्ला दिला आहे. खरीप हंगामात शेतीला लागणारी खते, बियाणे, कीटकनाशकाची उपलब्धता मुबलक राहील, या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. विभागाने बियाण्यांमध्ये कापसाचे ५५८१, तूर ३९००, सोयाबीन ५७३७५, ज्वारी ३७५, मूग १८७, उडीद १८७, भूईमुंग २५५०, धान २१३७५ क्विंटलनुसार नियोजन केले आहे. तसेच खतांमध्ये युरिया डीएपी, एमओपी, सिंगल सुपर फॉस्फेट संयुक्त व मिश्र खतांचे नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीन, कापूस व भात पिकाच्या सर्व वाणांची उत्पादकता जवळपास सारखीच असल्याने शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणाची मागणी करू नये, असा सल्ला दिला आहे. अनधिकृत अथवा विनापरवाना बियाणे खरेदी करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहे. शेतमाल विक्री व्यवस्थापन व साहित्याची उपलब्धता यासंदर्भात तालुका व जिल्हास्तरावर तक्रार निवारण व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. गुणवत्तापूर्ण कृषी साहित्य मिळावे यासाठी भरारी व दक्षता पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे.