रामटेक : कापसाचे दाेन वेचे घरी आले असून, कापूस पणन महासंघाने मात्र खरेदी केंद्र सुरू करायला नेहमीप्रमाणे याही वर्षी विलंब केला आहे. खुल्या बाजारात कापसाचे दर कमी असल्याने शेतकरी सीसीआय किंवा पणन महासंघाला आधारभूत किमतीप्रमाणे कापूस विकण्यास प्रधान्य देत आहेत. उशिरा का हाेईना पणन महासंघ नाेंदणीला साेमवार (दि. १४) पासून सुरुवात करणार आहे. परंतु खरेदी केंद्राचा घाेळ साेडविण्यात आला नाही.
पणन महासंघाने सावनेर येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले असून, ते रामटेकपासून ५० किमीवर आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना सावनेर येथे कापूस विकायला नेणे आर्थिकदृष्ट्या परवडण्याजाेगे नाही. त्यामुळे पणन महासंघाने पटगाेवरी (ता. रामटेक) येथील जिनिंगमध्ये सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्या अनुषंगाने रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीने पणन महासंघाला तसा प्रस्तावही पाठविला आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्री ऑनलाईन नाेंदणी केल्यानंतर या केंद्राला मंजुरी दिली जाणार असल्याचेही बाजार समितीचे प्रशासक रवींद्र वसू यांनी माहिती दिली.
नाेंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना कपाशीची नाेंद असलेला व त्यावर तलाठ्याची स्वाक्षरी असलेला नवीन सातबारा, बँक पासबुकची झेराॅक्स, माेबाईल क्रमांक, आधार क्रमांक अनिवार्य केले आहे. अलीकडच्या काळात रामटेक तालुक्यात कपाशीचे लागवड क्षेत्र वाढत आहे. परंतु विक्रीची प्रभावी साेय नसल्याने शेतकरी अडचणीत सापडतात. त्यामुळे ही समस्या साेडविणे गरजेचे आहे.
....
मागील हंगामात १४,०६६ क्विंटल कापसाची खरेदी
मागील हंगामात लाॅकडाऊनमुळे कापूस खरेदीचा तिढा निर्माण झाला हाेता. हा तिढा साेडविण्यासाठी पणन महासंघाने रामटेक तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू केले हाेते. त्यावेळी या केंद्रावर १४,०६६ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली हाेती, शिवाय शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ५,१०० ते ५,३०० रुपये भाव दिला हाेता. यावर्षी शासनाने मध्यम धाग्याच्या कापसाची आधारभूत किंमत प्रति क्विंटल ५,५१५ रुपये तर लांब धाग्याच्या कापसाची प्रति क्विंटल ५,८२५ रुपये जाहीर केली आहे. सध्या व्यापारी ५,००० रुपये ते ५,३०० रुपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी करीत असून, शासकीय खरेदी केंद्रावर याच कापसाला प्रति क्विंटल ५,७७५ रुपये भाव दिला जात आहे.