नागपूर : औषधींमध्ये ‘कोडीन’ हा घटक असलेले कोणतेही ‘कफ सिरप’ नशा आणते. उपराजधानीत यातील काही औषधींची सर्रास विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. या औषधींसोबतच आता झोपेच्या, वेदनाशामक, स्मरणशक्ती गोळ्यांची छुप्या पद्धतीने विक्री होत आहे. तरुणांपासून ते शाळेकरी विद्यार्थी याची नशा करायला लागल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
कुणाला दारूचा एक पेग, सिगारटेचा एक झुरका, तर कुणाला तंबाखू दाढेत ठेवल्याशिवाय ‘किक’ बसत नाही. औषधींमार्फत केली जाणारी ‘नशा’ हा या व्यसनातील आणखी एक प्रकार आहे. आयुष्यच संपवून टाकणारे हे व्यसन गेल्या काही वर्षांत उपराजधानीत वाढले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीही याला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे, नशा आणणाऱ्या औषधींच्या काळ्याबाजाराची पाळेमुळे आता ग्रामीण भागातही रोवू लागली आहेत.
या औषधींचा नशेसाठी होतो वापर
वातावरणातील बदलांमुळे सर्दी व खोकल्यांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. परिणामी, कफ सिरपच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. या औषधी विनाप्रिस्क्रिप्शन मिळत असल्याने नशा करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. याशिवाय झोपेसाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांचा वापरही अलीकडे नशा म्हणून केला जात आहे. अनेक वेदनाशामक (पेनकिलर) औषधांचा; तसेच स्मरणशक्ती वाढविणाऱ्या गोळीचा नशेसाठी वापर केला जात असल्याची माहिती एका डॉक्टरने दिली.
ब्रेड, कोल्ड ड्रिंकमधून घेतात औषधी
कफ सिरप औषधी सोडल्यास गोळ्यांच्या स्वरुपात असलेल्या औषधांची पावडर करून ती कोल्डड्रिंकमध्ये टाकून घेतात, तर काही तरुण ब्रेडवर जॅम लावून त्यावर ही भुकटी टाकून नशा करतात. नशा आणणारी औषधी सहज उपलब्ध होत असल्याने अनैतिक प्रकार वाढल्याचे अनेक घटनांतून समोर येत आहे.
शहरात लाखोंचा व्यवसाय
शहरात नशा आणणाऱ्या कफ सिरपचा दरमहिन्याचा व्यवसाय लाखो रुपयांचा आहे. यात अवैध पद्धतीने विक्री करणाऱ्या औषधीचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येत्या काही वर्षांत हा व्यवसाय दुपटीवर जाण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञ वर्तवीत आहेत.
खोट्या प्रिस्क्रिप्शनचा वापर
शहर व ग्रामीण भागातील बहुसंख्य औषधी विक्रेते डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही औषधी देत नाहीत; परंतु औषधींचा काळाबाजार करणारे व नशेबाज तरुण खोट्या डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन तयार करतात व त्यावर औषधींची नावे लिहून डॉक्टरांची खोटी सही करून औषधी खरेदी करतात.