लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माझे वाहन खराब झाल्यामुळे उमेदवारी अर्जासोबत बी-फार्म जोडता आला नाही, असे जि.प.चे माजी विराेधी पक्ष नेते अनिल निधान यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. तसेच पक्षासोबत बंडखोरी करण्याबाबतचे वृत्तही त्यांनी यावेळी फेटाळून लावले. मी भाजपाचा कार्यकर्ता होतो, आहे आणि राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत आ. टेकचंद सावरकर आणि योगेश डाफ हे सुद्धा उपस्थित होते.
निधान यांनी सांगितले की, सुरुवातीला निवडणूक लढण्याची माझी इच्छा नव्हती. पक्षाला मी तसे सांगितले ही होते. माझ्याऐवजी याेगेश डाफ यांना उमेदवारी द्यावी, अशी विनंतीही केली. पक्षाने माझी विनंती ऐकली. तरी गुमथाळा-महालगाव सर्कलमधून मीच निवडणूक लढावी,
अशी पक्षाची इच्छा होती. माझ्या आग्रहाखातर योगेश डाफला अर्ज भरण्यास सांगितले. सोबत मलाही अर्ज भरण्यास सांगण्यात आले. दोघांचेही बी-फार्म माझ्याजवळ देण्यात आले होते. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या गडबडीदरम्यान अर्ज केल्यानंतर बी-फार्म सोबत घेऊन येत असतााना माझे वाहन खराब झाले त्यामुळे वेळेपर्यंत बी-फार्म जोडता आले नाही. त्यामुळे माझे व डाफ यांचे अर्ज अपक्ष म्हणून ग्राह्य धरण्यात आले. दरम्यान पक्षाने सांगितल्यानुसार मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. आ. टेकचंद सावरकर यांनी सुद्धा अनिल निधान हेच पक्षाचे अधिकृत समर्थित उमेदवार असतील असे स्पष्ट केले.