नागपूर : औषधी व सर्जिकल साहित्य खरेदीसाठी मेडिकलने ७ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी हाफकिनच्या खात्यात जमा केला. परंतु वर्ष होऊनही उर्वरित ६ कोटींच्या औषधींचा पत्ता नाही. रुग्णालयात औषधांचा ठणठणाट पडला आहे. मेडिकलला दरदिवशी ५ हजारांवर औषधी खरेदी करता येत नसल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.
औषधे व यंत्रसामग्री खरेदीचे केंद्रीकरण करण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयांना लागणारे यंत्र, औषधे व साहित्य खरेदीची जबाबदारी ‘हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड’कडे देण्यात आली. रुग्णालयांना औषधी व सर्जिकल साहित्यासाठी मिळणारा ९० टक्के निधी हाफकिनच्या खात्यात जमा करण्याचे व उर्वरित १० टक्के निधीतून स्थानिक पातळीवर औषधी व इतर साहित्य खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व मेडिकल रुग्णालय हाफकिनच्या खात्यात निधी जमा करीत आहे. मात्र दरवर्षी सुमारे २५ टक्के ही औषधी मिळत नसल्याचे वास्तव आहे.
- मागील वर्षी मिळाल्या केवळ ६४ औषधी
प्राप्त माहितीनुसार, एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत मेडिकल प्रशासनाने औषधी व सर्जिकल साहित्याचा खरेदीसाठी जवळपास ७ कोटी ५८ लाखांचा निधी हाफकिनकडे वळता केला. यातून विविध प्रकारच्या २६१ औषधींची मागणी केली. परंतु शासनाने यातील १२२ औषधींनाच मान्यता दिली. परंतु हाफकिनकडून केवळ ६४ औषधी प्राप्त झाल्या. ५ कोटी ९४ लाखांच्या औषधीच मिळाल्या नसल्याने औषधींचा तुटवडा पडला आहे.
- यंत्रसामग्री, उपकरणांचे ५३ कोटी खर्चच झाले नाही
मिळालेल्या माहितीनुसार, मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील यंत्रसामग्री व उपकरणांसाठी २०१७ ते २०२२ या दरम्यान जवळपास ६० कोटींचा निधी हाफकिनकडे वळता करण्यात आला. या पाच वर्षांत यातील साधारण ७ कोटींची यंत्र खरेदी झाली. उर्वरित ५३ कोटींची खरेदीच झाली नाही.
- वेळेत खरेदी न झाल्याने वाढतात किमती
अनेक महत्त्वाची उपकरणे देशाबाहेरून खरेदी केली जातात. यात उशीर झाल्यास त्याच्या किमती वाढतात. परिणामी, वाढीव किमतीत यंत्र खरेदीला मंजुरी घेण्यापासून निधी मिळविण्यास वेळ जातो. याला जबाबदार कोण, हा प्रश्न आहे.