कार्यालयात गोंधळ : ओसीडब्ल्यूने केली पोलिसात तक्रार नागपूर : शांतिनगर भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नगरसेवक रवींद्र डोळस यांनी सतरंजीपुरा झोनच्या ओसीडब्ल्यूच्या कार्यालयात मंगळवारी गोंधळ घातला. टेबलवर खुर्ची आदळली. कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी ओसीडब्ल्यूचे झोनल मॅनेजर प्रदीप गुर्वे यांनी डोळस यांच्या विरोधात तहसील पोलिसात तक्रार नोंदविली आहे. शांतिनगर परिसरातील मेन फिडर लाईनवरील डायरेक्ट टॅपिंग १९ जुलैला बंद करण्यात आले आहे. यामुळे गेल्या आठवड्यापासून या भागातील पाणीपुरवठा बाधित झाला आहे. या संदर्भात डोळस यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी या संदर्भात महापौर प्रवीण दटके यांच्याशी चर्चा केली. परंतु त्यानंतरही समस्या सुटली नाही. त्यामुळे डोळस दुपारी १ वाजताच्या सुमारास सतरंजीपुरा झोन कार्यालयात पोहचले. प्रदीप गुर्वे यांच्या कक्षाजवळ पोहचले. फोनवर प्रतिसाद न दिल्याने त्यांनी गुर्वे यांना शिवीगाळ केली. पाईप लाईन न जोडल्यास हातपाय तोडण्याची धमकी दिली. तसेच कार्यालयात गोंधळ घातला. त्यानंतर ते निघून गेले. या संदर्भात गुर्वे यांनी वरिष्ठांना माहिती दिली. वरिष्ठांनी डोळस यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याची सूचना केली. त्यानुसार तक्रार करण्यात आली. (प्रतिनिधी) खुर्ची फेकली, धमकी दिली नाही ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी पूर्वसूचना न देता टॅपिंग बंद केले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून लोकांना पाणी मिळत नाही. या संदर्भात अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार फ ोन केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे कार्यालयात आलो. अधिकाऱ्यांना धमकी दिली नाही. पाण्याच्या समस्येसाठी कार्यालयात गेलो होतो. यात चुकीचे काहीही केले नाही -रवींद्र डोळस, नगरसेवक
पाण्यासाठी नगरसेवकाची अधिकाऱ्यांना धमकी
By admin | Published: July 27, 2016 2:51 AM