लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाला सारेच तोंड देत असताना नागपुरातील नागरिकांसमोर सकारात्मक मानसिकता जपणे हेदेखील महत्त्वाचे झाले आहे. नागरिकांचे समुपदेशन व्हावे तसेच त्यांना दवाखान्यात उपलब्ध ‘बेड्स’ व इतर सुविधांची माहिती व्हावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेवर कार्य करणाऱ्या सेवांकुर या संस्थेने पुढाकार घेतला आहे. रुग्णांसाठी नियंत्रण तसेच सहायता कक्षाचे उद्घाटन मंगळवारी झाले.
यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सेवांकुरसोबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व फडणवीस यांचे कार्यालय देखील जोडले जाणार आहे. त्यामुळे मदत कार्याचे एकाच कक्षातून नियोजन होऊ शकणार आहे. भाजपा वैद्यकीय आघाडी सुद्धा या उपक्रमात सहभागी आहे. डॉक्टर्स, वैद्यकीय विद्यार्थी, आयटी आणि स्वयंसेवक-कार्यकर्ते यात योगदान देतील. आपत्कालीन सेवेसाठी दोन रुग्णवाहिका येथे तैनात असतील. गरजू रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहाय्य करणे, त्यासाठी रुग्णवाहिका, इतरही सहाय्य पुरवणे आदी समन्वय या माध्यमातून होईल. प्लाझ्मा डोनेशन आणि लसीकरण यासाठी सुद्धा हा कक्ष काम करेल.
उद्घाटनप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, महापौर दयाशंकर तिवारी, सेवांकुरचे डॉ. सचिन जांभोरकर, डॉ. धीरज गुप्ता, पराग सराफ, डॉ. चरडे, कुमार मसराम, कन्हैय्या कटारे, प्रशांत दाणी प्रामुख्याने उपस्थित होते.