नागपूर : बनावट नोटा चलनात आणून भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या आंतरराष्ट्रीय कटामध्ये सामील झालेल्या चार देशद्रोही आरोपींना सोमवारी १२ वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली तसेच एकूण ६२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. एनआयए कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाचे न्या. पी. वाय. लाडेकर यांनी हा निर्णय दिला. मिर अनवरुल उर्फ मिर अली हुसैन (३७), मो. अब्दुल्ला ऊर्फ अब्दुल हक साकीर अली (४१), शेख गफ्फार उर्फ अब्दुल गफ्फार (५२) व शेख सत्तार शेख मुसा (३१) अशी आरोपींची नावे आहेत. मिर अनवरुल व मो. अब्दुल्ला हे पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील तर, शेख गफ्फार व शेख सत्तार चंद्रपूर जिल्ह्यामधील जिवती येथील रहिवासी आहेत.
नेमके काय होते प्रकरण?- दहशतवादविरोधी पथकाच्या नागपूर युनिटमधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्याशंकर मिश्रा यांच्या नेतृत्वातील पथकाने नागपूर रेल्वे स्थानक येथे ४ ऑक्टोबर २०१५ रोजी मिर अनवरुलकडून ९ लाख ११ हजार रुपयांच्या, तर १८ ऑक्टोबर २०१५ रोजी अब्दुल गफ्फारकडून ५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या.- सर्व नोटा १००० व ५०० रुपये मूल्याच्या होत्या. पुढील तपासामध्ये या नोटांच्या तस्करीत अन्य दोन आरोपींचाही समावेश असल्याचे आढळले. त्यामुळे चारही आरोपींना अटक करण्यात आली. बनावट नोटांच्या तस्करीविषयी दहशतवादविरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. - न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. प्रशांत सत्यनाथन यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड. वेदांत दाते व ॲड. नंदिनी सिंग यांनी सहकार्य केले.