योगेश पांडे
नागपूर - श्रीलंकेत जोपर्यंत व्यापार होता तोपर्यंत चीन, अमेरिका, पाकिस्तान तेथे जात होते. मात्र श्रीलंकेतील संकट, मालदीवमधील पाणीटंचाई यासह विविध देशांच्या मदतीला भारत सहजपणे धावून गेला. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक मोठे देश लहान राष्ट्रांची मदत करताना दिसतात. मात्र भारताकडूनच निस्वार्थ भावनेने सर्वांना मदतीचा हात दिला जातो. अमेरिका, चीनसारख्या बहुतांश देशांकडून स्वार्थातूनच इतरांना मदत होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. भारत विकास परिषद पश्चिम क्षेत्रातर्फे आयोजित चिंतन बैठकीच्या समारोप कार्यक्रमात ते गुरुवारी बोलत होते.
रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमाला सुप्रसिद्ध उद्योजक सत्यनारायण नुवाल, उमरावसिंह ओस्तवाल, विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजेंद्रसिंह संधू, चंद्रशेखर घुशे, श्याम शर्मा, सुधीर पाठक प्रामुख्याने उपस्थित होते. विश्वची माझे घर या भावनेने भारतीय काम करीत आहे. सुबत्ता असताना सारेच मदत करतात. पण कोणी संकटात असताना मदतीला धावून जाणे फक्त भारताचा स्वभाव आहे. भारताच्या विकासाच्या संकल्पनेत असंतुलित प्रगती नाही. मात्र पाश्चात्यांनी भारतावर विकासाचे एकांगी मॉडेल लादण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना चूक लक्षात आल्यावर तेदेखील बदलले. प्रत्येक देशाने आपापली गरज लक्षात घेऊन विकासाची दिशा ठरविली पाहिजे, असे भागवत म्हणाले.