१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्ध : नागपूरचे पुत्र मेजर देव यांचे बलिदान नागपूर : प्रत्येक पित्याची इच्छा आपल्या मुलाचा वाढदिवस आनंदाने साजरा करण्याची असते. हा क्षण कुणीही सोडू इच्छित नाही. कुटुंबापासून कितीही दूर असलो तरी सारेकाही सोडून या आनंदात सहभागी होण्यासाठी प्रत्येक माणूस धडपडतो. नागपूरच्या एका युवकाचीही आपल्या मुलाचा पहिलाच वाढदिवस आनंदाने साजरा करण्याची इच्छा होती. पण तत्कालीन काही स्थितीमुळे इच्छा असूनही त्यांना येता आले नाही. वरिष्ठांचा आदेश शिरोधार्ह मानून त्यांनी देशाचे काम जास्त महत्त्वाचे मानले. मुलाच्या वाढदिवशी त्यांना घरी परतायचे असताना वरिष्ठांनी रजा न दिल्याने वाढदिवसाला त्यांना येता आले नाही. पण नंतर इच्छा नसताना त्यांना रजा मिळाली आणि ते घरी परतले. त्यानंतर देशाची सेवा करण्याची इच्छा होती म्हणून कुणालाही न सांगता ते आपल्या जबाबदारीवर रुजू झाले. कारण अपत्यापेक्षाही त्यांना देश अधिक महत्त्वाचा वाटत होता. त्या युवकाचे नाव आहे वीर शहीद मेजर सुरेंद्र देव. शहीद मेजर सुरेंद्र देव यांनी भारत-पाकिस्तान दरम्यान १९६५ साली जे युद्ध झाले त्यात मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी देशासाठी बलिदान दिले. शुक्रवारी या युद्धाला ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त लोकमतने मेजर सुरेंद्र देव यांची पत्नी अनुराधा देव (फडणवीस) यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मेजर सुरेंद्र देव यांची वीरगाथा सांगितली. (प्रतिनिधी)वर्दी घातली आणि देशाच्या रक्षणासाठी निघालेएक दिवस त्यांनी रेडिओवर बातमी ऐकली. त्यात सीमेवर होणाऱ्या घटनांची माहिती होती. त्यानंतर त्यांनी वर्दी परिधान केली आणि जाण्यासाठी तयार झाले. ते कुठे निघाले आहेत याची माहिती कुणालाच नव्हती. त्यानंतर त्यांनी कळविले की, ते नागपूर रेल्वे स्टेशनवरुन जी. टी. एक्स्प्रेसने रवाना झाले. कामावर रुजू झाल्यावर त्यांना १६ सप्टेंबर १९६५ रोजी सियालकोट सेक्टरमध्ये पाठविण्यात आले.मन आणि बुद्धी सीमेवरच सुटी मिळाल्यावर सीमेवर असणारी स्थिती पाहता मेजर देव घरी येण्यास इच्छुक नव्हते. पण अधिकाऱ्यांच्या आदेशाला ते नाकारू शकत नव्हते. त्यामुळेच त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. येण्यापूर्वी त्यांनी टेलिग्राम पाठविला होता. तो मेजर घरी आल्यावर तीन दिवसांनी पोहोचला. पण त्यांच्या अचानक येण्याने कुटुंबीयांना आनंद झाला. ते घरी आले होते पण त्यांचे लक्ष घरात नव्हते. त्यांना विचारल्यावरही ते काहीच बोलले नाहीत. असेच जवळपास सहा दिवस गेलेत. तीन दिवसानंतर भेटला टेलिग्रामसियालकोट सेक्टरला ते सीमेवर तैनात होते. देशाच्या सीमांचे रक्षण करताना त्यांनी प्राणांची आहुती दिली. पण त्यांच्या वीरमरणाची बातमी आम्हाला तीन दिवसानंतर टेलिग्रामनेच मिळाली. मला त्यांचा अभिमान वाटतो. मी स्वत:ला भाग्यवान समजते कारण माझ्या पतीमुळे मला वीर नारी हा सन्मान प्राप्त झाला. त्यांनी देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. माझ्यासाठी ते आदर्श आहेत. ते मला पत्र पाठवायचे तेव्हा त्यात एखादा संदेश असा असायचा ज्यातून मला प्रेरणा मिळायची. आजही ही प्रेरणा मला मिळते. लालबहादूर शास्त्रींनी पाठविले पत्र मेजर सुरेंद्र देव मातृभूमीचे रक्षण करताना शहीद झाले. त्यांच्या वीर मरणानंतर तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी अनुराधा देव यांना एका पत्राद्वारे सांत्वना दिली होती. त्यांनी देशाच्या या वीरपुत्राला नमन केले. सुटी रद्द झालीत्या काळात संवादाची दोनच साधने होती. एक पत्र आणि दुसरे टेलिग्राम. पत्र येण्यासाठी १० दिवसांचा वेळ लागत होता. मेजर सुरेंद्र युद्धादरम्यान ८६ लाईट रेजिमेंट मध्ये होते. त्यांना अज्ञात स्थानाकडे जाण्याचा आदेश देण्यात आला. त्याच काळात आमच्या मुलाचा पहिला वाढदिवस होता. त्यांनी सुटीसाठी अर्ज केला होता, पण सुटी आधीच रद्द करण्यात आली होती. युद्ध सुरू असल्याने येणे शक्य नसल्याची सूचना त्यांनी कुटुंबाला दिली होती. पण काही काळानंतर त्यांचा अवकाश मंजूर करण्यात आल्याची सूचना त्यांना एका अधिकाऱ्याने दिली, अशी आठवण अनुराधा देव (फडणवीस) यांनी सांगितली.
कुटुंबापेक्षाही देशच जास्त महत्त्वाचा
By admin | Published: August 28, 2015 3:14 AM