सनातन योगा श्राईनतर्फे राष्ट्रभक्तीच्या कवितांचा कार्यक्रम नागपूर : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली. आजही सीमेवर तैनात असणारे सैनिक घरापासून, आपल्या प्रिय नातलगांपासून दुर असतात. देशवासी सुरक्षित राहावे म्हणून डोळ्यात प्राण साठवून ते सीमांचे रक्षण करतात. अनेकदा युद्धात ते शहीदही होतात. कारगील युद्धाच्यावेळी नुकतेच विवाह झालेले अनेक जवान शहीद झाले. या युद्धात नुकत्याच लग्न झालेल्या २२ ते २५ वर्षाच्या नववधू विधवा झाल्या. आयुष्याची सारी स्वप्नेच उधळली गेली. या नववधूंचे अश्रू पाहण्याचे सामर्थ्य कुणातही नव्हते. त्या प्रसंगांवर कवी डॉ. व्ही. पी. सिंग यांनी दोन ओळी ऐकविल्या आणि सभागृहाच्या अंगावर काटा उभा राहिला. ‘उन आँखों के आसू पर सात समंदर हारे हारे है...मेहंदीवाले हाथो ने जब मंगलसूत्र उतारे है..’अमेरिकेच्या शिकागो येथील धर्मसंसदेत स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाने संपूर्ण जगाला जिंकले होते. त्या भाषणाला यंदा १२१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सनातन योगा श्राईनच्यावतीने स्वामी विवेकानंदांचे स्मरण करताना राष्ट्रभक्तीच्या कवितांचा ‘जननी जन्मभूमी’ हा कार्यक्रम साई सभागृहात आयोजित केला. या कार्यक्रमात राष्ट्रीय कवी डॉ. व्ही. पी. सिंग यांनी कवितांच्या दमदार सादरीकरणाने उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले. कधी सैनिकांच्या व्यथा तर कधी राजकारण्यांची बेगडी देशभक्ती कवितेतून व्यक्त करीत सैनिकही अखेर एक माणूस असतो. त्याच्या पत्नीची आणि मुलांची त्याला आठवण येते, त्यांच्यासाठी सीमेवर असताना तो व्याकुळ होतो. त्यालाही वृद्ध मातापित्यांची आठवण येते, पण देशासाठी लढताना तो सारे विसरतो. सैन्यात हे सारे आपण जवळून अनुभवले आहे. आईच्या आठवणीने व्याकुळ झाल्यावर सैनिकांचे पाणावलेले डोळे मी पाहिले आहेत आणि सैनिकांच्या तरुण विधवांचे अश्रू मी अनुभवले आहे, असे सांगत डॉ. सिंग यांनी उपस्थितांच्या हृदयाला हात घातला. या अनुभवातूनच आपल्या कविता निर्माण झाल्या आणि सैनिकांच्या भावना शब्दबद्ध झाल्या. अनेकवेळा युुवा पत्नींचे पत्र सैनिकांना येतात. त्यांना आठवण येते म्हणून त्या सैनिकांना परत घरी बोलावत असतात पण जाज्वल्य देशप्रेमाने भारलेला सैनिक या भावनेवर मात करून आपल्या पत्नीला उलट टपाली देशप्रेमाचेच धडे देत असतात. ही भावना फार मोठी आहे. पण आपल्या देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना पुरेसा सन्मान मिळत नाही.दहशतवादी कारवाया आणि शेजारी शत्रूराष्ट्रांचा बंदोबस्त करण्यात नेहमीच सरकार चुकते. प्रेम, क्षमा, बोलणी या बाबींनी आतापर्यंत काहीही थांबले नाहीच. पाकिस्तानच्या संदर्भात भावना करताना ते व्यक्त म्हणाले, ‘जहरीले साप कभी करुणा की बात नही सुनते...वे तभी मानते है जब उनके दात उखाडे जाते है’ हे बदलावे म्हणून ‘अब शपथ उठाओ, भारत का अपमान नही होने देंगे’ अशा ओळींनी त्यांनी दाद घेतली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कर्नल सुनील देशपांडे, डॉ. अर्चना पटेल, सविता संचेती, सुरेश शर्मा, योगाचार्य केदार जोशी उपस्थित होते. याप्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देत समाजाची सेवा करणाऱ्या सात मान्यवरांचा स्मृतिचिन्ह, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यात योगगुरु रामभाऊ खांडवे, शोभा ग्रोव्हर, स्वामिनी ब्रह्मप्रकाशानंदा, सुरेश शर्मा, अवंतिका चिटणवीस, जी. एम. टावरी, डॉ. व्ही. पी. सिंग यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन योगाचार्य केदार जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)
देह कटे पर देश कभी नही कटता है..!
By admin | Published: November 16, 2014 12:47 AM