लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देश राज्यघटनेनुसारच चालायला पाहिजे. अन्यथा देशातील जनतेत असंतोष निर्माण होईल असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.डॉ. सूरज येंगडे व डॉ. आनंद तेलतुंबडे संपादित ‘द रॅडिकल इन आंबेडकर क्रिटिकल रिफ्लेक्शन्स’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अन्य वक्त्यांमध्ये अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले व डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. गौतम कांबळे यांचा समावेश होता. डॉ. येंगडे व्यासपीठावर उपस्थित होते. हा कार्यक्रम डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या ना. ह. कुंभारे सभागृहात झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ भारतासाठी नाही तर, संपूर्ण जगाच्या कल्याणाकरिता अमूल्य योगदान दिले आहे. त्यांनी भारताला दिलेली राज्यघटना जगात सर्वोत्कृष्ट व सर्वसमावेशक आहे. त्यांच्याशिवाय कुणीही अशी राज्यघटना तयार करू शकले नसते. ही राज्यघटना सर्वांचे कल्याण करणारी आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या बाहेर जाऊन कोणतीही कृती या देशात व्हायला नको असे थोरात यांनी पुढे बोलताना सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी देशातील अन्यायग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणले. त्यांनी देश व समाजाकरिता दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही असे विचार खांदेवाले यांनी व्यक्त केले.वर्तमान काळात या जगाची भांडवलवादी व समाजवादी अशी विभागणी केली जाऊ शकते. देशात एकीकडे मूठभर लोक दिवसेंदिवस अधिक श्रीमंत होत असून दुसरीकडे दारिद्र्य वाढत आहे. ही विषमता येणाऱ्या काळात संपणे आवश्यक आहे असे कांबळे यांनी तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यक्तिमत्त्व होते असे येंगडे यांनी सांगितले.
देश राज्यघटनेनुसारच चालायला पाहिजे : सुखदेव थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:01 PM
देश राज्यघटनेनुसारच चालायला पाहिजे. अन्यथा देशातील जनतेत असंतोष निर्माण होईल असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्दे ‘द रॅडिकल इन आंबेडकर क्रिटिकल रिफ्लेक्शन्स’ पुस्तकाचे प्रकाशन