सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रक्ताशी संबंधित गंभीर आजारावर ‘बोनमॅरो प्रत्यारोपण’ हा यशस्वी उपचार आहे. संबंधित रुग्णास त्याच्याशी जुळणारा ‘स्टेमसेल’ दाता उपलब्ध झाल्यास त्याला नवे आयुष्य मिळू शकते. परंतु स्टेमसेल जुळणारे अल्प प्रमाणात दाते उपलब्ध होत असल्याने अशा आजारात मृत्यूचे प्रमाण आजही अधिक आहे. यावर उपाय म्हणून देशातील पहिल्या बोनमॅरो नोंदणीची सुरुवात दीड वर्षांपूर्वी नागपूर मेडिकलमधून झाली. मात्र, सुरुवातीच्या दोन दिवसानंतर नोंदणी बंद झाली ती कायमचीच.वैद्यकीय शिक्षण विभाग व टाटा ट्रस्टच्या मदतीने राज्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक व नागपूर येथे ‘बोनमॅरो रजिस्ट्री’चे उद्घाटन नागपूर येथील मेडिकलमधून सप्टेंबर २०१७ ला झाले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. उद्घाटनानंतर दोन दिवस नोंदणी केंद्र सुरू होते. ३५० जणांनी नोंदणी केली. परंतु त्यानंतर केंद्र बंद पडले ते कायमचेच.
नागपुरात ‘बोनमॅरो रजिस्ट्री’ महत्त्वाचीरक्ताशी संबंधित गंभीर आजारावर ‘बोन मॅरो प्रत्यारोपण’ हा यशस्वी उपचार आहे. याची सुरुवात नागपुरातून होणे महत्त्वाचे होते. कारण पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली येथे थॅलेसेमिया व सिकलसेलचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे. एकट्या उत्तर नागपुरात सिकलसेल व थॅलेसेमियाचे ४० हजारावर रुग्ण आहेत. अनुसूचित जाती-जमाती व काही इतर समाजातील दुर्बल घटकांमध्ये या रोगाचे प्रमाण मोठे आहे. यात वैद्यकीय शिक्षण विभागाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने सुरू केलेल्या ‘बोनमॅरो रजिस्ट्री’मुळे दाता उपलब्ध होऊन यासारख्या अनेक रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होते.
१७ शहरांमध्ये दात्यांची तयार होणार होती यादीपहिल्या टप्प्यात नागपूर, पुणे, मुंबई, औरगांबाद आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये बोनमॅरो रजिस्ट्री हा प्रकल्प सुरु होणार होता. या शिवाय राज्यातील १७ प्रमुख शहरामधून स्वयंसेवी देणगीदारांचा डाटाबेस तयार करण्यात येणार होते. परंतु तूर्तास सर्वच थंडबस्त्यात पडले आहे.