लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रक्ताशी संबंधित गंभीर आजारावर ‘बोन मॅरो प्रत्यारोपण’ हा यशस्वी उपचार आहे. संबंधित रुग्णास त्याच्याशी जुळणारा ‘स्टेमसेल’ दाता उपलब्ध झाल्यास त्याला नवे आयुष्य मिळू शकते; परंतु अल्प प्रमाणात जुळणारे स्टेमसेल दाते उपलब्ध होत असल्याने अशा आजारात मृत्यूचे प्रमाण आजही अधिक आहे. यावर उपाय म्हणून देशातील पहिल्या बोन मॅरो नोंदणीची सुरुवात चार वर्षांपूर्वी नागपूर मेडिकलमधून झाली; परंतु दोन दिवसांनंतरच नोंदणी बंद झाली ती कायमचीच.
पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा हा सिकलसेल व थॅलेसेमिया या आजाराचा गड आहे. हजारो रुग्ण मरणयातना सहन करीत जगत आहेत. या आजारावर ‘बोन मॅरो प्रत्यारोपण’ हाच पर्याय असल्याने याची सुरुवात नागपुरातून होणे महत्त्वाचे मानले जात होते. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुढाकाराने व टाटा ट्रस्टच्या सहकार्याने राज्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक व नागपूर येथे देशातील पहिली ‘बोन मॅरो रजिस्ट्री’ तयार होणार होती. याचे उद्घाटन नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सप्टेंबर २०१७ ला झाले. उद्घाटनानंतर जवळपास ३५० जणांनी नोंदणी केली. परंतु त्यानंतर हे केंद्र उघडलेच गेले नाही.
१७ शहरांमध्ये दात्यांची तयार होणार होती यादी
पहिल्या टप्प्यात नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये बोन मॅरो रजिस्ट्री हा प्रकल्प सुरू होणार होता. या शिवाय राज्यातील १७ प्रमुख शहरांमधून स्वयंसेवी देणगीदारांचा डेटाबेस तयार करण्यात येणार होता; परंतु तूर्तास सर्वच थंड बस्त्यात पडले आहे.
बाधितांसाठी रजिस्ट्री सुरू होणे आवश्यक
सिकलसेल व थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी ‘बोन मॅरो प्रत्यारोपण’ हाच एकमेव उपचार आहे; परंतु ‘बोन मॅरो रजिस्ट्री’ होत नसल्याने ‘अनरिलेटेड बोन मॅरो ट्रान्सप्लांट’मध्ये अडचणी येत आहेत. शासनाने पुढाकार घेऊन ही ‘रजिस्ट्री’ सुरू करणे गरजेचे आहे.
-डॉ. विंकी रुघवानी, संचालक थॅलेसेमिया व सिकलसेल, सेंटर