२३ आॅक्टोबरपासून होणार सुरुवात : वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे पत्र नागपूर : रक्ताशी संबंधित गंभीर आजारावर ‘बोन मॅरो प्रत्यारोपण’ हा यशस्वी उपचार आहे. संबंधित रुग्णास त्याच्याशी जुळणारा स्टेमसेल दाता उपलब्ध झाल्यास त्याला नवे आयुष्य मिळू शकते. परंतु अल्प प्रमाणात जुळणारे स्टेमसेल दाते उपलब्ध होत असल्याने अशा आजारात मृत्यूचे प्रमाण आजही अधिक आहे. याला घेऊन शासनाने भारतातील प्रथम राज्यस्तरीय बोन मॅरो रजिस्ट्री स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात २३ आॅक्टोबरला नागपूरच्या मेडिकलमधून होत आहे. या संदर्भातील वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे एक पत्र मेडिकलला प्राप्त झाले आहे. देशात सर्वसाधारणपणे चार ते पाच हजार रक्ताशी संबंधित गंभीर आजारांचे नवे रुग्ण आढळून येतात. यात सिकलसेल, ल्युकेमिया, लायफोमा, थॅलेसेमिया, अल्फास्टीक अॅनिमेया आदींचा सामवेश आहे. या आजारावर बोन मॅरो प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट) हाच यशस्वी उपचार आहे. परंतु अल्प प्रमाणात जुळणारे स्टेमसेल दाते उपलब्ध होत नसल्याने रुग्ण अडचणीत यायचे. तत्काळ बोन मॅरो दाता मिळणेही शक्य होत नव्हते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यात चार ठिकाणी ‘बोन मॅरो‘ची रजिस्ट्री तयार करण्याचा निर्णय घेतला. यात पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर येथे बोन मॅरो रजिस्ट्री तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर मुंबईत बोन मॅरो प्रत्यारोपणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, रजिस्ट्री तयार झाल्यानंतर रुग्णांसाठी बोन मॅरो उपलब्ध करण्यासाठी प्रत्यक्ष दात्याला काही पैसे द्यावे लागणार नाहीत. रक्ताचे नाते नसलेला बोन मॅरो जुळणारा दाता सापडल्यानंतर मात्र त्याने माघार घेऊ नये, एवढीच सक्ती यात असणार आहे. याची सुरुवात नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेडिकल) होत आहे. २३ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. बोन मॅरो रजिस्ट्रीचे महत्त्व व गरज लोकांना समजावे आणि लोकांचा यात सहभाग वाढावा यासाठी १७ आॅक्टोबरपासून जनजागृती मोहीम हाती घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)
देशातील पहिले बोन मॅरो रजिस्ट्री मेडिकलमध्ये
By admin | Published: October 16, 2016 2:41 AM