- मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे : पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर : भारतासारख्या प्राचीन देशात विविध संस्कृतीच्या शासनकर्त्यांनी राज्य केले. राज्य कुणाचेही असो त्यात न्यायप्रणाली नेहमीच राहिली. भारतीय न्यायव्यवस्थेतही निरंतर बदल होत राहिले. जो बदलतो तोच टिकतो, असे मत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी येथे व्यक्त केले.
‘कोर्ट ऑफ इंडिया भारताचे न्यायालय-एक सिंहावलोकन’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या हस्ते झाले. हायकोर्टाच्या सभागृहात बुधवारी झालेल्या समारंभात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती झेड. ए. हक प्रामुख्याने उपस्थित होते.
बोबडे म्हणाले, नवीन कायदे आले. काही जुने कायदे बाजूला करण्यात आले. काही कायद्यात बदल झाले. राज्य कुणाचेही असो नागरिकांचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास होता आणि आजही आहे व पुढेही राहील.
ज्या लोकांना इंग्रजी येत नाही, ते आपले म्हणणे न्यायालयात मातृभाषेत मांडू शकतात. कोर्ट ऑफ इंडिया हे पुस्तक इंग्रजीत असल्याने सर्व नागरिक वाचू शकत नाहीत. प्रत्येकाला समजावे म्हणून पुस्तकाचे अन्य भाषेतही भाषांतर व्हावे, असा प्रस्ताव समोर आला. आता या पुस्तकाचे भाषांतर अन्य भाषेतही करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून देशाच्या न्यायव्यवस्थेचा इतिहास व विकास लोकांना आपल्या भाषेत समजेल आणि वाचता येईल.