लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधवेशी सलगी करून तिचे शारीरिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या दाम्पत्यावर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तनवीर हुसेन हैदर हुसेन जाफरी आणि नुरीन खान अशी आरोपी दाम्पत्याची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना भोपाळमध्ये जाऊन अटक केली.
तक्रार करणारी महिला २६ वर्षांची असून ती विधवा आहे. ती खासगी कंपनीत नोकरी करते. कंपनीच्या कामाने ती मार्च २०१८ मध्ये उज्जैनला गेली होती. तेथे याच कंपनीत काम करणारा तनवीर हुसेन जाफरी (भोपाळ) याच्यासोबत तिची ओळख झाली. मैत्रीनंतर या दोघांनी आपले मोबाईल नंबर एक्सचेंज केले. त्यानंतर ते सलग संपर्कात राहू लागले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि या दोघांमध्ये शरीरसंबंधही प्रस्थापित झाले. दरम्यान, दोघांच्या संबंधाची माहिती जाफरीच्या पत्नीलाही कळली. तिने त्याला हरकत न घेता दोघांच्या लग्नाला स्वीकृती दर्शविली. एवढेच नव्हे तर महिलेकडून सोबत व्यापार करण्याच्या नावाखाली ४ लाख ५० हजार रुपये घेतले. नंतर मात्र लग्न करण्यास आणि घेतलेली रक्कम परत करण्यास जाफरी दाम्पत्याने नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने महिलेने एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणात तनवीर आणि त्याची पत्नी नुरीविरुद्ध ॲट्रॉसिटी अंतर्गत बलात्कार तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी भोपाळला असल्याने त्यांना शोधणे जिकरीचे काम झाले होते. मात्र, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके, पोलीस उपायुक्त नुरूल हसन, सहायक आयुक्त अशोक बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शशिकांत मुसळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींचा छडा लावून त्यांना अटक केली.
---