लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरासमोर वाहन पार्क करण्यावरून जरीपटका येथील म्हाडा कॉलनीत झालेल्या वादात एक दाम्पत्य आणि त्यांच्या नातेवाईकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणात आरोपींना पोलिसांनी जामीन दिल्यामुळे पीडित कुटुंबीय संतप्त आहे.रुबीना तबस्सूम कुरैशी, तिचे पती माजिद कुरेशी आणि नातेवाईक (रुबीनाचे वडील) नसीम शेख अशी जखमीची नावे आहे. कुरैशी परिवार म्हाडा कॉलनीत राहतो. आरोपी अरमान अंसारी आणि शकीला अंसारी हेसुद्धा त्याच वस्तीत राहतात. गेल्या २२ जुलै रोजी दुपारी रुबीनाचे वडील वाहनातून सामान उतरवित होते. त्याचवेळी अरमान तिथे आला. तो रुबीनाच्या वडिलांशी वाद घालू लागला. रुबीना व तिचे कुटुंबीय मध्यस्ती करू लागले. त्यामुळे अरमान आणि त्याची आई शकिला यांनी त्यांच्यावर हल्ला केला. रुबीना, तिचे पती आणि नसीम शेख यांना गंभीर जखमी केले. या घटनेमुळे वस्तीत तणाव निर्माण झाला. तिघांनाही जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुबीनाचा उपचार सुरू असून दोघांना सुटी देण्यात आली. जरीपटका पोलिसांनी आरोपींच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३२४ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपींची जामीनावर सुटका केली. गुरुवारी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रकरण चर्चेत आले. पोलिसांनी आरोपींना जामीनावर सोडल्याने प्रश्न उपस्थित करण्यात आले.माजिद कुरेशी यांनी आरोपीच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर जरीपटका पोलिसांचे म्हणणे आहे की, मेडिकल रिपोर्टच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात येईल. शेजाऱ्यांमधील भांडण असल्याने आणि योग्य जामीनदार सादर केल्याने आरोपींना जामीन देण्यात आला.पूर्वीपासूनच सुरू होता वादवाहन पार्किंगवरून दाम्पत्य व आरोपींमध्ये पूर्वीपासूनच वाद सुरू होता. आरोपी त्यांना घरासमोर वाहन उभे केल्यास शिवीगाळ करीत होते. शेजारी असल्याने दम्पत्यांनी वाद वाढवणे योग्य समजले नाही. ताजा घटनेने प्रकरण चर्चेला आले. रुबीनाची प्रकृती गंभीर असल्याने तिचे कुटुंबीय आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहेत.