लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन वर्षांपूर्वी भूखंडाचा सौदा करून १६ लाख रुपये घेतल्यानंतर एका दाम्पत्याने भूखंडाची विक्रीही करून दिली नाही अन् रक्कमही परत केली नाही. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या बनवाबनवी प्रकरणात शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
छाया चंद्रकुमार सोनवणे आणि चंद्रकुमार रामलाल सोनवणे (वय ५०) अशी आरोपींची नावे आहेत. ते इंद्रप्रस्थनगरात राहतात. माधवनगरातील रहिवासी कमलेश प्रेमजीभाई सोंडागर (वय ५१) यांनी सोनवणे दाम्पत्यासोबत त्यांचा भामटीतील भूखंड ४१ लाखांत विकत घेण्याचा सौदा १८ जुलै २०१८ ला केला होता. तेव्हापासून २३ जुलै २०१८ पर्यंत त्यांनी सोनवणे दाम्पत्याला १६ लाख रुपये चेक आणि रोखीच्या स्वरूपात दिले. उर्वरित रक्कम विक्रीच्या वेळी देण्याचे ठरले होते. तेव्हापासून विक्री करून घेण्यासाठी सोंडागर यांनी सोनवणे दाम्पत्याकडे वारंवार चकरा मारल्या. मात्र, आरएल नसल्याचे कारण पुढे करून त्यांनी टाळाटाळ केली. एनआयटीतून त्या भूखंडाचे आरएल निघत नसल्याचे स्पष्ट झाल्याने सोंडागर यांनी करारनामा रद्द करून आपली रक्कम परत मागितली. आरोपींनी त्यांना चेक दिले. मात्र, त्यांच्या खात्यात रक्कम नसल्याने ते वटले नाहीत. आपली रक्कम परत मिळावी म्हणून वारंवार प्रयत्न करूनही आरोपींनी दाद दिली नसल्यामुळे अखेर सोंडागर यांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.