लाेकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : माेटारसायकलने जात असलेल्या दाम्पत्याला तीन अनाेळखी व्यक्तींनी शिवारातील नाल्याजवळ अडविले आणि त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील साेन्याचे दागिने व राेख रक्कम असा एकूण ७६ हजार रुपये किमतीचा ऐवज हिसकावून घेतला. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उदासा-वेलसाखरा शिवारात शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.
सैजाद खान कादर खान (वय ३२, रा. ताजबाग, दिघाेरी चाैक, नागपूर) हा व त्याची पत्नी माेटारसायकलने (एमएच-४९/एयू-५६२५) नागपूरहून वेलसाखरा (ता. उमरेड) येथे त्याच्या मित्राच्या घरी जात हाेते. दरम्यान, उदासा-वेलसाखरा दरम्यानच्या नाल्याजवळ माेटारसायकलवर आलेल्या तीन अनाेळखी व्यक्तींनी त्या दाम्पत्याला अडविले. त्यांना शिवीगाळ करीत शस्त्र दाखविले आणि त्यांच्याकडील पाच हजार रुपयांची साेन्याची मंचली, सहा हजार रुपयांचे साेन्याचे मंगळसूत्र, सहा हजार रुपयांची साेन्याची बाली, २४ हजार रुपयांचा साेन्याहार, २८ हजार रुपये राेख व सात हजार रुपयांचा माेबाईल असा एकूण ७६ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला आणि तिघांनीही तिथून पळ काढला. त्यानंतर सैजाद खान याने पाेलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी भादंवि ३९४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक राजू डाेर्लीकर करीत आहेत.