नागपूर - न्यायालयाच्या निवृत्त निबंधकांकडे धाडसी घरफोडी झाली. चोरट्याने रोख आणि दागिन्यांसह पावणेसात लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. सक्करदऱ्यातील रघुजीनगर वसाहतीत झालेल्या या धाडसी घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दीपक खसाळे हे न्यायालयाचे निवृत्त निबंधक आहेत. ते रघुजीनगर वसाहतीत दुमजली घरात राहतात. त्यांच्या नातेवाईकांचे लग्न असल्याने काही दिवसांपूर्वी मुलगी तसेच अन्य नातेवाईक घरी आले होते. लग्नाच्या निमत्ताने दागिनेवगैरे घरच्या कपाटात काढून ठेवण्यात आले होते. दरम्यान, ६ डिसेंबरला खसाळे कुटुंबीय वरुड (जि. अमरावती) येथील नातेवाईकांकडे गेले होते. सोमवारी ते परत आले असता त्यांना मुख्य दाराचे कुलूप तुटून दिसले. चोरट्यांनी त्यांच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील रोख पाच हजार तसेच सोन्याचे दागिने असा एकूण ६ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही माहिती कळाल्यानंतर सक्करदराचे ठाणेदार सत्यवान माने आपल्या सहकाऱ्यांसह खसाळे यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यांनी श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञांनाही बोलवून घेतले. मात्र, श्वानाकडून चोरट्याचा माग मिळू शकला नाही. मीनाक्षी दीपक खसाळे (वय ६०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
---
बेलतरोडीतही घरफोडी
बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्यानगरातही घरफोडीची घटना सोमवारी रात्री उघड झाली. धनसिंग फागूसिंग चव्हाण (वय ४९) यांच्या मुलीचे सोमवारी लग्न होते. त्यामुळे घरची मंडळी सुयोगनगरातील रंजना सेलिब्रेशन हॉलमध्ये गेली होती. त्याचा लाभ उठवत चोरटे चव्हाण यांच्या दाराचे कुलूप तोडून आत शिरले आणि घरातील रोख ८० हजार तसेच सोन्याचे दागिने चोरून नेले. सायंकाळी चव्हाण कुटुंबीय घरी परतले तेव्हा ही चोरीची घटना उघडकीस आली. चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
----