लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अगोदर रेमडेसिविरचा घोळ घातल्यानंतर आता लसींच्या घोळाने केंद्र सरकारचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही ॲम्फोटेरिसिन-बी औषधाच्या तुडवड्यावरून केंद्र सरकारला खडे बोल सुनावले. केंद्र सरकार आता तरी म्युकरमायकोसिसचे औषध उपलब्ध करून देणार आहेत का, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.
कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसिस रोगाने लोक त्रस्त आहेत. रुग्णांची संख्या वाढत आहे; परंतु या आजारावर उपयोगी असलेल्या ॲम्फोटेरिसिन-बी औषधांचा पुरेसा पुरवठा होत नाही. मोदी सरकारकडे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी कोणतेही धोरण नाही. न्यायालयात केवळ तोंडी माहिती देतात व वरून हे न्यायालयाचे नाव नाही, असे सांगणे म्हणजे बेफिकीरपणाचे लक्षण आहे, असे लोंढे म्हणाले.
औषधे पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे या जबाबदारीतून पळ काढू नका. ॲम्फोटेरिसिन-बी औषध नागपूरला उपलब्ध करून द्या, अशी मागणी लोंढे यांनी केली आहे.