न्यायालय पंतप्रधानांसोबतही कठोरतेने वागू शकते
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 11:14 PM2018-07-25T23:14:18+5:302018-07-25T23:16:39+5:30
कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरण चालवित असलेले अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. काझी यांनी एका मुद्यावरून प्रकरणातील आरोपींना न्यायालय गरज पडल्यास देशाच्या पंतप्रधानासोबतही कठोरतेने वागू शकते असे सुनावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरण चालवित असलेले अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. काझी यांनी एका मुद्यावरून प्रकरणातील आरोपींना न्यायालय गरज पडल्यास देशाच्या पंतप्रधानासोबतही कठोरतेने वागू शकते असे सुनावले.
न्या. काझी राजकीय दबावात कार्य करीत असल्याचे आरोपींचे म्हणणे आहे. न्यायालयाने यावर खंत व्यक्त करून आरोपींचा हा समज पूर्वग्रहदूषित असल्याचे सांगितले. तसेच, न्यायालय राजकारणात कधीच शिरत नाही. न्यायालय गरज पडल्यास देशाच्या पंतप्रधानासोबतही कठोरतेने वागू शकते. ही बाब आरोपींनी समजायला हवी असे मत त्यांनी आदेशात नोंदवले.
आरोपींना हे प्रकरण दुसऱ्या न्यायालयात स्थानांतरित करायचे आहे. त्याकरिता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुदत मिळावी यासाठी आरोपींनी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जात न्यायालय राजकीय दबावात कार्य करीत असल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायाधीश काझी यांनी आरोपींना त्यांचे प्रयत्न करण्याची संधी मिळावी म्हणून अर्ज मंजूर केला व आरोपींना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी १५ दिवसांचा वेळ दिला. परंतु, तत्पूर्वी त्यांनी वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदविले.
गणेश शाहू व त्याची पत्नी गुडिया हे प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांच्यावर उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांचा खून केल्याचा आरोप आहे. ही घटना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती. घटनेच्या दिवशी आरोपी व उषा कांबळे यांच्यामध्ये भिसीच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय राशीचाही निर्घृण खून केला. त्यानंतर दोघांचेही मृतदेह नाल्यात फेकून दिले. आरोपी पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.