नागपूर : स्वत:चा पाच वर्षीय मुलगा, सख्खी बहीण व तिच्या कुटुंबातील सदस्यांसह एकूण पाच जणांची हत्या करणाऱ्या विवेक पालटकर (वय ४२) याला फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. पावसकर यांनी शनिवारी हा निर्णय दिला. या क्रौर्याला बळी पडलेल्यांमध्ये त्याचा मुलगा कृष्णा (वय ५), सख्खी बहीण अर्चना पवनकर (४५), अर्चनाचे पती कमलाकर पवनकर (४८), मुलगी वेदांती (१२) आणि कमलाकर यांची आई मीराबाई (७३) यांचा समावेश आहे. पवनकर कुटुंब दिघोरीतील आराधनानगर येथे राहत होते. विवेक कमलाकर यांचा मेहुणा होता. पत्नीच्या हत्येच्या आरोपात त्याला न्यायालयाने जन्मठेप सुनावली होती. त्याला जामीन मिळविण्यासाठी कमलाकर यांचे सुमारे पाच लाख खर्च झाले होते.
पैशावरून सुरू होता वाद कमलाकर आरोपीकडे पैसे मागत होते. यावरून त्यांच्यात वाद सुरू होते. त्यामुळे आरोपीने पवनकर कुटुंबीयांचा घात करण्याचा कट रचला. ११ जून २०१८ ला पहाटे पालटकरने पाच जणांची हत्या केली. त्याला पोलिसांनी २१ जूनला पंजाबमध्ये अटक केली होती.