लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात अवैध होर्डिंग, बॅनर लावणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने झोन स्तरावर कारवाई करण्याचे अधिकार दिले आहे. न्यूसन्स डिटेक्शन स्क्वॉड गठित करून स्वच्छता दूत नियुक्त केले आहे. असे असूनही शहरात ठिकठिकाणी अवैध होर्डिंग व बॅनरची भरमार सुरू आहे. यात महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकही आघाडीवर असून न्यायालयाच्या आदेशाची सर्रास अवहेलना सुरू असल्याचे चित्र आहे.महापालिकेत भाजपाचे तब्बल १०८ नगरसेवक निवडून आले. यामुळे प्रशासनावर भाजपा नगरसेवकांचा दबदबा असल्याने अवैध होर्डिग वा बॅनर लावणाऱ्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. काही दिवसापूर्वी भाजपाच्या दोन आमदारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. उत्साहाच्या भरात त्यांच्या समर्थकांनी परवानगी न घेता शुभेच्छा देण्यासाठी शहरात ठिकठिकाणी अवैध होर्डिंग लावले. महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश असलेल्या मित्र मंडळाने वाहतूक सिग्नल, पथदिव्यांच्या खांबावर अवैध होर्डिंग व बॅनर लावले. शहराचे खुलेआम विद्रुपीकरण सुरू असूनही महापालिका प्रशासनाने दोषींच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.महापालिकेने होर्डिंग व बॅनर लावण्यासाठी जागा निश्चित केलेल्या आहेत. या ठिकाणी होर्डिंग लावण्यासाठी महापालिकेकडे शुल्क जमा करून अर्ज करावा लागतो. परंतु पदाधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करीत आहेत.मनोज चापले दुसºयांदा आरोग्य समितीचे सभापती झाले. ते आमदार कृष्णा खोपडे यांचे कट्टर समर्थक आहेत. तसेच मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांचेही ते समर्थक आहे. त्यांनी मित्र मंडळाच्या नावावर विधानसभा क्षेत्राचा विचार करता अग्रसेन चौक ते वर्धमाननगर या दरम्यानच्या मार्गावरील चौकात होर्डिंग लावले आहे.सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील चंद्रशेखर आझाद चौकात मेट्रोच्या कामामुळे जागा निमुळती झाली आहे. येथील वाहतूक सिग्नलवर लावण्यात आलेल्या अवैध होर्डिंगमुळे वाहनचालकांना समोरील वाहन दिसत नाही. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.वैष्णवदेवी चौकात भाजपाच्या शुभचिंतकांनी होर्डिंग लावले आहे. तसेच स्थायी समितीवर एकाच प्रभागातील चार जणांना संधी मिळाली आहे. आनंदाच्या भरात त्यांनी आपल्या प्रभागात ठिकठिकाणी अवैध होर्डिंग लावलेले आहेत. पूर्व व मध्य नागपुरात अवैध होर्डिंगची भरमार असूनही महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.
न्यायालयाचा आदेश धाब्यावर ; अवैध होर्डिगची भरमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:37 AM
शहरात अवैध होर्डिंग, बॅनर लावणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने झोन स्तरावर कारवाई करण्याचे अधिकार दिले आहे. न्यूसन्स डिटेक्शन स्क्वॉड गठित करून स्वच्छता दूत नियुक्त केले आहे. असे असूनही शहरात ठिकठिकाणी अवैध होर्डिंग व बॅनरची भरमार सुरू आहे.
ठळक मुद्देभाजपा पदाधिकारी, नगरसेवकांचे चौकाचौकात होर्डिग