नागपूर : अश्लील गाणी गाऊन ती यूट्यूबवर अपलोड केल्याचा आरोप असलेला लोकप्रिय रॅप गायक बादशाह याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दणका दिला आहे. आवाजाचे नमुने रेकॉर्ड करण्याची मागणी करणाऱ्या अर्जावर उत्तर सादर करण्यासाठी बादशाहला अंतिम संधी देण्यात आली आहे. त्याला येत्या ७ फेब्रुवारीपर्यंत उत्तर मागण्यात आले आहे. अन्यथा, हा अर्ज त्याच्या उत्तराशिवाय निकाली काढला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
प्रकरणावर न्या. एस. एस. जाधव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. बादशाहवरील आरोप सिद्ध करण्यासाठी त्याच्या आवाजाचे नमुने रेकॉर्ड करणे आवश्यक आहे. त्यामुळे इंदोरा येथील व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी संबंधित अर्ज दाखल केला आहे. पाचपावली पोलिसांनी जब्बल यांच्या तक्रारीवरून २६ एप्रिल २०१४ रोजी बादशाहसह गायक हनीसिंगविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. हनीसिंगने आवाजाचे नमुने दिले आहेत. बादशाह आवाजाचे नमुने द्यायचा आहे. तो याकरिता टाळाटाळ करीत आहे. परिणामी, न्यायालयाने बादशाहविरुद्ध कडक भूमिका घेतली. अर्जदारातर्फे ॲड. रसपालसिंग रेणू यांनी कामकाज पाहिले.